मुंबई - 'धरलं तर चावतंय सोडलं तर पळतंय..' काय करू सांगा? घर चालवायचंय, गाडीचे हप्ते भरायचेत, पास काढून भाडी वाहतोय सध्या. पण मनात धाकधुक आहेच. गाडीत बसलेला प्रवासी कोरोना संसर्गित तर नाही ना? अनेक ठिकाणी पोलिसांचे चेक नाके.. हातात ग्लोज घातले. टोलनाक्यावर नेमके सुट्टे पैसे काढून ठेवतो. टोल नाक्याच्या पावत्या काम झाल्यावर जवळ न ठेवता टाकून देतोय. काळजावर दगड ठेवून काम सुरू आहे... ही भयग्रस्त मनाची परिस्थिती व्यक्त केलीय वाहनचालक दशरथ माळी यांनी.. 'ईटीव्ही भारत'ने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी त्याच्या डोळ्यात भयमिश्रित काळजी स्पष्ट दिसून येत होती.
ग्रामीण भागातील तरुणांसाठी वाहनचालकाचा व्यवसाय म्हणजे हुकमी स्वयंरोजगाराचा मार्ग असे सूत्रच झालेय. अलीकडे ओला-उबेरच्या ॲग्रीगेटर मॉडेलमुळे या स्वयंरोजगाराला पालवी फुटली होती. जीवघेण्या स्पर्धेच्या युगात कष्टाला पर्याय नव्हता. कर्जपाणी करून गाड्या घेतल्या काहींनी मालकांच्या गाड्या घेऊन फक्त चालक होणेच पसंद केले... कित्येकांच्या संसाराचा गाडा या रस्त्यावर धावणाऱ्या चाकांवरून सुरळीत चालू होता, अचानक 22 मार्च रोजी देशव्यापी लॉकडाऊन घोषित झाला अन् सर्व वाहनचालक जागच्या जागेवर ब्रेक लावल्यासारखे घरीच थांबले...
रोजगाराचं धावतं चलन एकाएकी बंद झालं. मुंबई शहर सुरुवातीपासून रेडझोनमध्ये आहे. त्यामुळे वाहतुकीचे निर्बंध अत्यंत कठीण. त्यात कोरोनाची भीती त्यामुळे अनेकांनी घरीच बसणं पसंत केलं. अनेक वाहनचालकांनी अत्यावश्यक सेवेत उडी घेतली. कुणी भाजीविक्री करू लागलं तर, कोणी फळविक्री. तुलनेत ऑरेंज आणि ग्रीन झोनमधील वाहनचालकांना थोडासा दिलासा मिळाला. त्यामुळे ऑनलाईन पास काढून अत्यावश्यक सेवेसाठी गाड्या सुरू झाल्या.