मुंबई : केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशांनुसार १८ ते ४० वयोगटातील मुंबईकर नागरिकांसाठी ‘आपदा मित्र’ हा १२ दिवसांचा विशेष प्रशिक्षण कार्यक्रम बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन प्रशिक्षण केंद्रात सुरु करण्यात येत आहे. महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. संजीव कुमार यांच्या मार्गदर्शनात आयोजित करण्यात येणारे हे प्रशिक्षण पूर्णपणे मोफत असणार आहे. अशी माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे.
1000 मुंबईकरांना प्रशिक्षण :या प्रशिक्षण कार्यक्रमाबाबत अधिक माहिती देताना आपत्कालीन व्यवस्थापन खात्याच्या प्रमुख रश्मी लोखंडे यांनी सांगितले की, भारत सरकारचे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारितील राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या निर्देशांनुसार बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रासाठी अर्थात मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हा या २ जिल्ह्यांच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांमार्फत बृहन्मुंबईतील रहिवाशी असणाऱ्या नागरिकांना सहभागी होता येईल. रविवार वगळता १२ दिवसांचा हा प्रशिक्षण कार्यक्रम आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या परळ येथील आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण केंद्रात सुरु करण्यात येत आहे. आपत्कालीन परिस्थितीत प्रशिक्षण प्राप्त असलेल्या प्रशिक्षित नागरिकांची गरजूंना मदत व्हावी आणि संभाव्य जीवित व वित्तहानी कमीतकमी व्हावी, या प्रमुख उद्देशाने हे प्रशिक्षण सुरु करण्यात येत आहे. या प्रशिक्षणाच्या पहिल्या टप्प्यात मुंबई शहर व मुंबई उपनगरातील प्रत्येकी ५०० याप्रमाणे एकूण १००० नागरिकांना प्रशिक्षित करण्यात येणार आहे.
'या' वयोगटातील नागरिकांना प्रशिक्षण :या प्रशिक्षण कार्यक्रमात वय वर्षे १८ ते ४० या वयोगटातील किमान ७ वी उत्तीर्ण असलेले मुंबईचे रहिवाशी अर्ज करु शकतात. सोबतच, संरक्षण दलातून सेवानिवृत्त झालेले, वैद्यकीय व्यवसायिक आणि स्थापत्य अभियंता यांच्यासाठी वयाचे निकष शिथिल केले जाऊ शकतात. या प्रशिक्षणासाठी अर्ज असणाऱ्या व्यक्तींचे शारिरीक, मानसिक व वैद्यकीय आरोग्य चांगले असणे आवश्यक आहे. यासाठी आवश्यक ते फिटनेस प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य असेल. तसेच आपत्ती प्रतिसाद कार्यात स्वंयसेवा करण्याचा पूर्वानुभव असलेल्या अर्जदारांना प्राधान्य देण्यात येईल.