महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अत्यावश्यक सेवा देणाऱ्या महानगरपालिका कर्मचाऱ्यांचा संपात सहभाग नाही

पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकारने अगोदरचे कामगार कायदे रद्द करून नवीन कायदे तयार केले. याला सर्व कर्मचारी आणि कामगारांचा तीव्र विरोध आहे. याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज देशव्यापी संप केला जात आहे. मात्र, कोरोनाच्या परिस्थिती पाहता बीएमसी कर्मचारी संपात प्रत्यक्ष सहभागी होणार नाहीत.

Strike
संप

By

Published : Nov 26, 2020, 1:29 PM IST

मुंबई -देशभरात नवीन कामगार कायद्याविरोधात कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. ही नाराजी प्रकट करण्यासाठी आज विविध कामगार संघटनांनी देशव्यापी संप पुकारला आहे. मुंबईत कोरोनाची परिस्थिती असल्याने अत्यावश्यक सेवेत येणारे महानगरपालिका कर्मचारी संपात सहभागी होणार नाहीत. मात्र, काम करूनही ते संपाला पाठिंबा देतील, असे मुंबई मनपा कामगार कर्मचारी संघटना समन्वय समितीकडून सांगण्यात आले.

सर्व शासकीय आणि निमशासकीय कर्मचारी व कामगारांच्या संपाविषयी माहिती देताना ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी

'या'मुळे होत आहे संप -

केंद्र सरकारने उद्योजकतेच्या नावाखाली उद्योजकांना फायदा पोहचावा म्हणून लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनात 27 कायदे रद्द करून 3 नवीन कामगार कायदे लागू केले आहेत. या 3 कायद्यांमुळे 75 टक्के कामगार कायद्याच्या कक्षेतून बाहेर पडणार आहेत. त्यांना नवीन कायद्यांमुळे कामगारविषयक कायदेशीर संरक्षण मिळणार नसल्याने कामगार संघटनांनी आज देशभरात एक दिवसाचा संप पुकारला आहे.

...तर भविष्यात तीव्र आंदोलन होईल -

आजच्या एक दिवसीय संपात17 लाख कर्मचारी सहभागी होत आहेत. जुनी पेन्शन लागू करा, कामगारांसाठी राबवण्यात येणारी धोरणे त्यांना मान्य असणे गरजेचे आहे, यासह विविध मागण्या संपकऱ्यांच्या आहेत. कामगार, कर्मचारी आणि शेतकरी सहभागी असलेल्या संपाकडे राज्य आणि केंद्र सरकारने दुर्लक्ष केल्यास भविष्यात तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सरचिटणीस विश्वास काटकर यांनी दिला आहे.

कोरोनामुळे महानगरपालिका कर्मचारी संपात सामील नाहीत -

केंद्र सरकारने घाई-घाईने मंजूर केलेल्या कामगार कायद्यांचा आज निषेध होत आहे. मात्र, एक लाखापेक्षा अधिक असलेले मुंबई महानगरपालिका कर्मचारी अत्यावश्यक सेवा बजावत आहेत. कोरोनाची परिस्थिती पाहता हे कर्मचारी प्रत्यक्षात संपामध्ये सामील होणार नाहीत. केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाचा मुंबई मनपाचे कर्मचारी काम करूनच निषेध करतील, असे मुंबई मनपा कामगार कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या अ‌ॅड. प्रकाश देवदास यांनी सांगितले.

हेही वाचा -वाढीव वीज बिलाविरोधात मनसेच्या राज्यव्यापी आंदोलनास सुरुवात; पाहा LIVE अपडेट्स..

ABOUT THE AUTHOR

...view details