मुंबई- महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर भाजपा महानगरपालिका नगरसेवक गटातर्फे गटनेता प्रभाकर शिंदे व नगरसेवक यांनी महानगरपालिका अधिनियम 1888 च्या कलम 36 ( ह ) अन्वये तातडीची सभा घेऊन त्यात अविश्वास ठरावाचा प्रस्ताव सादर केला आहे. या प्रस्तावाची चर्चा करण्यासाठी महापौरांनी त्वरीत प्रत्यक्ष बैठक लावावी, अशी मागणी भाजपा नगरसेवकांकडून पत्राद्वारे करण्यात आली आहे.
भाजपा ने दिलेल्या पत्रात महापौर किशोरी किशोर पेडणेकर यांच्याविरुद्ध अविश्वास व्यक्त करत आहे, असे म्हटले आहे. मार्च 2020 पासून आजपर्यंत गेल्या सहा महिन्यांत कोविड महामारीचा सामना करण्यात महापालिकेतील सत्ताधारी पक्षाला आलेले अपयश , वाढता मृत्युदर , वाढती रुग्णसंख्या , अपुरी आरोग्य यंत्रणा , निष्क्रीय प्रशासन , उदासीन सत्ताधारी आणि कोविडच्या नावाखाली जंबो भ्रष्टाचार, या अपयशाला जबाबदार असणाऱ्या मुंबईच्या महापौर यांच्यावर अविश्वास व्यक्त करणारा प्रस्ताव भाजपाने मांडला आहे, असे प्रभाकर शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.