महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'बालकांचे मृत्यू नाही तर हत्याच' ; याला सरकारच जबाबदार असल्याचा भाजपा नेत्यांचा आरोप

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात आग लागून दहा नवजात बालकांचा मृत्यू झाला. या प्रकरणानंतर आता राज्यात राजकारण सुरू झाले आहे. भंडाऱ्यातील घटनेला राज्य सरकार जबाबदार असल्याची टीका भाजपा नेत्यांनी केली आहे.

BJP Leaders
भाजपा नेते

By

Published : Jan 9, 2021, 11:33 AM IST

Updated : Jan 9, 2021, 12:06 PM IST

मुंबई -भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात केयर युनिटमध्ये (SNCU) आग लागली. या घटनेनंतर विरोधकांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार राम कदम आणि चित्रा वाघ यांनी जोरदार टीका केली. शनिवारी मध्यरात्री दोन वाजता लागलेल्या आगीत दहा नवजात बालकांचा मृत्यू झाला. SNCU मध्ये एकूण 17 नवजात बालके होती. या विभागामध्ये आऊट बॉर्न आणि इन बॉर्न अशी दोन युनिट आहेत. यापैकी इन बॉर्नमधील सात बालके सुखरूप आहेत. तर आऊट बॉर्न युनिटमधील 10 बालकांचा मृत्यू झाला.

भंडाऱ्यातील घटनेला सरकारच जबाबदार असल्याची भाजपा नेत्याची टीका

हीच शासकीय रुग्णालयांची वास्तवता -

भंडाऱ्यात घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. या घटनेमुळे राज्यातील शासकीय रुग्णालयांची अवस्था समोर आली आहे. रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा फटका नागरिकांना बसला आहे. या रुग्णालयातील वीजपुरवठा यंत्रणेत ज्यांनी दुर्लक्ष केले आहे त्यांची चौकशी करावी. त्यांना कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. या घटनेत ज्या कुटुंबांतील बालकांचा मृत्यू झाला आहे, त्यांच्या दु:खात भाजपा सहभागी आहे. त्यांना दु:ख सहन करण्याची शक्ती मिळो, अशी भावना दरेकरांनी व्यक्त केली. तसेच रुग्णालयातील ज्या कर्मचाऱ्यांनी इतर लहान मुलांना वाचवले त्यांचेही दरेकर यांनी अभिनंदन केले.

याला राज्य सरकार जबाबदार -

भंडारा जिल्हा रुग्णालयात झालेल्या घटनेला सर्वस्वी सरकार जबाबदार आहे. सरकारच्या निष्काळजीपणामुळे या अगोदरही अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. भंडाऱ्यातील आगीत लहान मुलांचा मृत्यू झाला नाही तर, ती शासनाने केलेली हत्याचं आहे, अशी संतप्त टीका भाजपा आमदार राम कदम यांनी केली आहे. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी देखील या घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. राज्य सरकारने या प्रकरणाची चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली.

Last Updated : Jan 9, 2021, 12:06 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details