महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वांद्रे पश्चिम मतदार संघ : भाजप उमेदवार आशिष शेलार यांची विशेष मुलाखत

वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातून मंत्री आशिष शेलार हे निवडणूक लढवत आहेत. शेलार हे वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे भाजप, शिवसेना, रिपाइं महायुतीचे उमेदवार आहेत. त्यांची विशेष मुलाखत घेतली आहे आमचे प्रतिनिधी संजीव भागवत यांनी.

आशिष शेलार

By

Published : Oct 16, 2019, 11:01 PM IST

Updated : Oct 16, 2019, 11:15 PM IST

मुंबई - वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातून मंत्री आशिष शेलार हे निवडणूक लढवत आहेत. शेलार हे वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे भाजप, शिवसेना, रिपाइं महायुतीचे उमेदवार आहेत. त्यांची विशेष मुलाखत घेतली आहे, आमचे प्रतिनिधी संजीव भागवत यांनी..

प्रश्न: वांद्रे पश्चिम हा मतदारसंघ एकीकडे उच्चभ्रू आणि दुसरीकडे गरीब अशा समाजात विभागलेला आहे, अशा वेळी या दोन्ही समाजांमध्ये आपण कशा प्रकारचा समन्वय साधता?

उत्तर :खरे तर हा मतदारसंघ म्हणजे एक मिनी भारत आहे. या मतदारसंघात देशातील बहुतांश राज्यातील लोक येथे राहतात. विविध प्रकारच्या जाती, धर्माचे, बोलीभाषा संस्कृतीचे असलेले हे लोक मतदारसंघात आहेत. त्यामुळे या मतदारसंघात काम करणे तसे खूप मोठे आव्हान आहे. त्यामध्ये मी सर्वात सोपा आणि सरळ नियम म्हणून मागील पंधरा वर्षापासून जो माझ्याकडे येईल तो आपला. ज्याचे काम अडले असेल ते आपले ध्येय आणि त्याचे काम पूर्ण करणे हीच आपली प्रेरणा, असे समजून मी अतिशय प्रामाणिकपणे, आणि सेवाभावी वृत्तीने काम करत राहिलो. त्यामुळे हे गणित जमले की जनतेचा प्रेम हे आपोआप मिळत असते आणि ते मला मिळत गेले.

प्रश्न : एकीकडे हा काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जात होता, आपण आमदार झाल्यानंतर इकडचे चित्र बदललेले दिसते असे येथील सर्वसामान्य नागरिक सांगतात, यावर काय सांगाल?
उत्तर : या मतदारसंघात दुर्दैवाने काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार आणि मंत्री असताना त्यावेळी त्यांनी केवळ व्होट बँकचे राजकारण केले. खऱ्या अर्थाने विकासाचे काम केलेच नाही. मतांचे ध्रुवीकरण हे होत राहीले आणि आपण त्या आधारावर आपण जिंकत राहू, अशा भ्रमात राहिले. त्यामुळे या मतदारसंघातील एक मोठा भाग वंचित राहिला. त्यामुळे मी छोट्या का असेना परंतु विविध माध्यमातून विकास कामाला गती द्यायला लागलो. थेट मतदार आणि अधिकारी यांच्याशी समन्वय साधण्याचा प्रयत्न करू लागलो. तेव्हा मतदारांना एक विश्वास आला की, हो आता हे शक्य आहे. अशी भावना त्यांच्यात निर्माण झाली आणि त्यामुळे आजमितीला माझ्यापेक्षा येथील मतदारच माझा प्रचार करत आहेत, असे मला दिसत आहे.

प्रश्न : या मतदारसंघात एकीकडे मुस्लीम आणि दुसरीकडे ख्रिश्चन समुदाय मोठ्या प्रमाणात आहे, अशा स्थितीत या समाजात आपण कशाप्रकारे समन्वय साधतात?

उत्तर : माझ्या मतदारसंघात ख्रिश्चन दलित आणि मुस्लीम बांधव आहेत. इतकेच नाही तर शीख, पारशी बांधवसुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत. आणि हा सर्व समाज अत्यंत शांततेने राहतो. प्रत्येक समाजाची आवश्यकता वेगवेगळी आहे आणि त्याच्या भागानुसार त्यांच्या आवश्यकतेनुसार जी काम हवी होती ती करण्यासाठीचा प्रयत्न करणे याला मी प्राथमिकता दिली. विशेषता माझ्या मतदारसंघात सांस्कृतिक कार्यक्रमाचे एक मोठे जाळे आहे. या माध्यमातून मी विविध फेस्टिवल आणि उत्सव याचे आयोजन करत असतो. त्यामुळेच प्रत्येकाला हा मतदारसंघ एखाद्या कुटुंबासारखा वाटतो. त्यामुळे माझ्यावर मतदार प्रेम करत असतात.

प्रश्न : आपण मुंबईचे भाजपाध्यक्ष राहिलेला आहात राज्याची चांगली राजकीय जाण आपल्याला आहे, तर यावेळी एकूणच राज्यात चित्र कसे असेल, असे आपल्याला वाटते?

उत्तर: मी मुंबईतील विविध मतदारसंघात गेलो आहे आणि ते चित्र पाहून मला असे वाटते त्यामध्ये 36 पैकी 36 जागा भाजप-शिवसेना युतीला मिळाल्या तर त्यात आश्चर्य वाटण्याचे काही कारण नाही. आता आमची घोडदौड 32 ते 33 जागा यांच्यापुढे गेलीच आहे. या शेवटच्या तीन-चार दिवसांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार असल्याने त्यातून कार्यकर्त्यांचा उत्साह वाढेल आणि त्यातून 36 पैकी 36 जागा मुंबईत आम्हाला मिळतील, असे मला वाटते. राज्यभरात म्हणाल तर राज्यात वेगवेगळ्या विभागांमध्ये वेगवेगळे मुद्दे आहेत पण सर्वदूर आपण पाहिलं निष्कलंक नेता सर्वसामान्यांना भेटणारा नेता असे एकमेव देवेंद्र फडणवीस जी यांचे नेतृत्व आहे आणि हेच आमच्यासाठी सगळ्यात मोठे असेट आहे आणि त्याबरोबर राज्यात जी कामे केलेली असतील त्याचा फायदा आम्हाला प्रत्यक्षात मोदीची आणि देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मिळणार आहे. त्यामुळे यावेळी आम्ही 220 आणि त्याहीपेक्षा पुढे जाऊ, असा मला विश्वास आहे.

प्रश्न : अलीकडे शरद पवार आपल्या प्रचारात मला महाराष्ट्रासाठी काहीतरी करायचा आहे असे म्हणतात, तर यावर नेमके काय सांगाल?

उत्तर :खरे तर कोणाला महाराष्ट्रासाठी काही करायचे असेल तर त्याला नाकारण्याचे आपले काही कारण नाही. पण कोण केव्हा आणि कधी बोलते याला फार महत्त्व आहे. सर्वात जास्त वर्ष एका महत्त्वाच्या पदावर राहिलेले एकमेव नेते म्हणजे शरद पवार. सगळ्यात जास्त सत्तेत राहिलेले आणि सत्ता नसतानाही सर्वात जास्त काम करून घेतलेले नेते सुद्धा शरद पवार हेच आहेत, अशी त्यांची सर्वदूर ओळख आहे. त्यांना पुन्हा जर असे म्हणावे लागते की मला काहीतरी करायचेय याचा अर्थ एकच मला वाटते की, पश्चातबुद्धी. आजपर्यंत मला जमले नाही ते आता तरी मला संधी द्या, पण मला वाटते लोक हुशार आहेत. त्यांनाही कळते कोण केव्हा आणि कधी आणि कशासाठी म्हणाले. याचे उत्तर आता जनतेने ठरवावे.

Last Updated : Oct 16, 2019, 11:15 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details