मुंबई- भाजपच्या पहिल्या यादीतून लातूर आणि अहमदनगरच्या विद्यमान खासदारांचे पत्ते कट करण्यात आले आहेत. तर नव्या चेहऱ्यांना पक्षात संधी देण्यात आली आहे. त्यामुळे पहिल्या यादीत नाव न आलेल्या विद्यमान खासदारांची धाकधूक वाढली आहे.
भाजपने गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या १८४ जणांच्या यादीत महाराष्ट्रातल्या वजनदार राजकीय कुटुंबांना आणि विद्यमान खासदारांना संधी देण्यात आली आहे. मात्र, पक्ष तुल्यबळ उमेदवारांच्या शोधात असल्याचे सुजय विखे यांच्या नावावरून स्पष्ट झाले आहे. अहमदनगरमध्ये ३ वेळा खासदार राहिलेल्या दिलीप गांधी यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. तसेच माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव करून 'जायंट किलर' ठरलेल्या शरद बनसोडे यांचाही पत्ता कट होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
भाजप-शिवसेना युतीचे मुंबईत ईशान्य मुंबई मतदार संघ वगळता उमेदवारांचे चित्र स्पष्ट झाले आहे. मात्र, पहिल्या यादीत ईशान्य मुंबईचे खासदार किरीट सोमय्या यांचे नाव आले नाही. सोमय्या यांच्या नावाला शिवसैनिकांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. तर सोलापूरमध्ये शरद बनसोडे यांच्या जागी धार्मिक गुरू डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा आहे. तर पालघर लोकसभा मतदार संघात काँग्रेसमधून भाजपात आलेले माजी मंत्री राजेंद्र गावित यांनी पोटनिवडणुकीत शिवसेनेचा पराभव करून विजय मिळवला होता. आता ही जागा शिवसेनेला सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवसेनेला ही जागा सोडल्यास भाजप विद्यमान खासदार गावित यांचा पत्ता ही कट होणार आहे. त्यामुळे गावितही दुसऱ्या यादीच्या प्रतीक्षेत आहेत. पालघरची जागा शिवसेनेला गेल्यास राजेंद्र गावित यांच्या राजकीय पुनर्वसनाचा प्रश्न भाजप पुढे निर्माण होणार आहे.