मुंबई -येत्या 9 नोव्हेंबरला होणारी छटपूजा उत्तर भारतीयांनी आपापल्या घरीच साजरी करावी, असे परिपत्रक राज्य सरकार व मुंबई महापालिकेने जारी केले आहेत. यामुळे निर्देश दिल्याने भाजपा आणि काँग्रेसने याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
उत्तर भारतीयांवर सरकारचा अन्याय - भाजप
उत्तर भारतीय बांधव अतिशय शिस्तप्रिय असतात. त्यामुळे राज्य सरकार कोरोनाच्या नियमांचं पालन करून छटपूजेला परवानगी देऊ शकत होती. मात्र जाणून-बुजून उत्तर भारतीय समाजावर अन्याय करण्यासाठीच अशा पद्धतीचे निर्बंध लादण्यात आले आहेत, अशी प्रतिक्रिया मुंबई भाजपचे प्रवक्ते अजय सिंह यांनी व्यक्त केली आहे. यावरून मुंबई महानगरपालिकेत सत्तारुढ असलेल्या शिवसेनेची उत्तर भारतीयांप्रती असलेली मानसिकताच लक्षात येते. हा उत्तर भारतीय समाजावर केला गेलेला अन्याय आहे असेही ते म्हणाले.
गणेश उत्सवाला परवानगी, छटपूजेला का नाही..? - काँग्रेस
या संदर्भात बोलताना मुंबई युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरजसिंह ठाकूर यांनी म्हणाले, मुंबई महानगर पालिकेने गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवाचे अतिशय चांगल्या प्रकारे आयोजन केले होते. जर या उत्सवांचे आयोजन व्यवस्थित होऊ शकते. तर छटपूजेला परवानगी का नाकारण्यात आली आहे. यामुळे मुंबईमध्ये राहणाऱ्या सुमारे 30 लाख उत्तर भारतीयांवर अन्याय होत असल्याची भावना प्रकर्षाने जाणवत असल्याचे त्यांनी सांगितले.