मुंबई- कोरोना काळात अत्यावश्यक सेवा व आरोग्य कर्मचाऱ्यांना नियोजित स्थळी पोहचवण्याचे काम बेस्टच्या कराचार्यानी केले. यात बेस्टच्या साडेतून हजारपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. या कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करून कोरोनापासून मुक्त करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे बेस्टचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिलकुमार सिंगल यांना आंतरराष्ट्रीय संस्थांनी बाह्य तज्ज्ञ सल्लागार म्हणून 28 जून रोजी आमंत्रित करण्यात आले आहे.
बेस्ट मुंबईची लाईफलाईन
"कार्यक्षम सेवेची अखंड परंपरा" या ब्रीद वाक्याला अनुसरून कोरोना व टाळेबंदीच्या काळात इतर सर्व वाहतूक सेवा बंद असतानाही बेस्ट उपक्रमाने अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी पालघर, आसनगाव, बदलापूर, पनवेलपर्यंत आपल्या बसगाड्यांद्वारे वाहतूक सेवा उपलब्ध करून दिल्या. तसेच बेस्टच्या वीज कर्मचाऱ्यांनी देखील न घाबरता नवीन कोविड सेंटरला त्वरित वीज पुरवठा उपलब्ध करून दिला. युद्धपातळीवर कोविड हॉस्पिटल व संसर्गजन्य विभागात वीजपुरवठा पुनर्स्थापित करून दिला. म्हणूनच कोविड महामारीत बेस्ट मुंबईची मुख्य लाईफ लाईन म्हणून उदयास आली आहे.
बाह्य सल्लागार म्हणून नियुक्त
बेस्टच्या या सामुदायिक कार्याची दखल यापूर्वी जिनिव्हा येथील आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने 1 डिसेंबर, 2020 रोजी घेतली होती. आता जागतीक आरोग्य संघटना, जी २० लीडर कंट्री, युरोपियन कमिशन, फाईंड, मिलिंडा आणि बिल गेट्स फाऊंडेशन यांनी सुरू केलेल्या "द ऍक्सेस टू कोविड - 19 टूल्स ऍक्सलरेटर" The Access to Covid-19 Tools Accelerator (ACT-A) या मोहिमेअंतर्गत तत्काळ अँटिजेन टेस्टद्वारे कोविड मुक्त कामाचे ठिकाण या विषयावर चर्चा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय संस्थांनी बेस्टचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिलकुमार सिंगल यांना बाह्य तज्ज्ञ सल्लागार म्हणून दिनांक 28 जून, 2021रोजी आमंत्रित करण्यात आले आहे.
बेस्टने राबविलेल्या उपाययोजना
- सहविकृती ग्रस्त, दिव्यांग व कोविड रुग्णांच्या संपर्कात आलेल्या कर्मचाऱ्यांना भरपगारी रजा देण्यात आली.
- दहा हजारांपेक्षा जास्त जनजागृती अभियानांच्या मदतीने कर्मचाऱ्यांमध्ये कोविड प्रतिबंध दक्षतेची अंमलबजावणी केली.
- कर्मचाऱ्यांना लागणारी सॅनिटाइजर, मास्क, हॅंडग्लोव्ज यासारखी वैयक्तिक संरक्षणाची साधने उपलब्ध करून दिली
- कोविडचे तत्पर निदान करण्यासाठी 25 हजार कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी व 18 हजार पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांच्या बस आगारात तत्काळ अँटिजेन चाचण्या करण्यात आल्या.
- "तुम्ही कसे आहात?" या मोहिमेअंतर्गत कोविड संसर्गबाधित कर्मचाऱ्यांशी दररोज दोन वेळा दूरध्वनीद्वारे संवाद साधून गरज भासल्यास त्यांना कोविड सेंटर/ हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात पुढाकार घेतला.
- सुरळीत लसीकरण मोहिमेद्वारे आतापर्यंत 80 टक्के कर्मचाऱ्यांनी प्रथम मात्रा व 60 टक्क्यांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी लसीची दुसरी मात्राही घेतलेली आहे.
- अशा उपाययोजनांमुळे संपूर्ण मुंबई कोविडमुळे अतिबाधित झाली असताना देखील पहिल्या लाटेत 2 हजार 9800 व दुसऱ्या लाटेमध्ये केवळ 565 बेस्ट कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली.
हेही वाचा -'सौ चुहे खाके बिल्ली हज को चली' जयंत पाटील यांचा भाजपला टोला