मुंबई -वांद्रे टर्मिनस-रामनगर एक्स्प्रेस दोन डबे सोडून पुढे पळाल्याची धक्कादायक घटना काल सकाळी जोगेश्वरी आणि राम मंदिर रेल्वे स्थानकादरम्यान घडली. सुदैवाने यात कसलीही दुर्घटना आणि जीवितहानी झालेली नाही. मात्र, पश्चिम रेल्वे मार्गावर घडलेल्या या घटनेमुळे प्रवासी सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
हेही वाचा -केरळमध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढली; मुंबई विमानतळावर प्रवाशांची तपासणी
अशी घडली घटना
काल वांद्रे टर्मिनसहून रामनगरसाठी एक्स्प्रेस रवाना झाली. या एक्स्प्रेसला रिकामा डबा बंद करून जोडण्यात आला होता. पहाटे, 5 वाजून 27 मिनिटांच्या सुमारास जोगेश्वरी-राम मंदिर स्थानकादरम्यान गाडी धावत असताना जोरदार आवाज झाला. एक्सप्रेसचे बंद असलेले शेवटचे दोन डबे निसटले. हे समजताच एक्सप्रेस थांबविण्यात आली. त्यानंतर घटनास्थळी रेल्वे अधिकारी आणि कर्मचारी पोहचले. सकाळी 6 वाजून 40 मिनिटांनी हे डबे जोडून एक्सप्रेस रवाना करण्यात आली. मात्र, सकाळी 7 वाजून 15 मिनिटांनी नायगाव-वसई रोडला एक्सप्रेस पोहचताच पुन्हा डबे निसटले. शेवटी निसटलेले डबे बाजूला करत एक्स्प्रेस रवाना करण्यात आली, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.