मुंबई- दादर येथील महापौर निवासाच्या जागी उभारण्यात येणाऱ्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या कामासाठी प्राप्त झालेली एक निविदा नाकारण्यात आली आहे. दोन निविदांपैकी लघुत्तम निविदा 54.50 टक्के अधिक दराची असल्याने ती नाकारण्यात आली असल्याची माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी विधान परिषदेत दिली.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभे करण्याच्या संदर्भात विलास पोतनीस, हेमंत टकले, विक्रम काळे, ख्वाजा बेग, विद्या चव्हाण आदींनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले.
हेही वाचा -जात पडताळणीसाठी आता १ वर्षांची मुदत, विधानसभेने विधेयक केले मंजूर
यावेळी शिंदे म्हणाले, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या निविदा रद्द करण्यात आल्यानंतर बाळासाहेब ठाकरे स्मारक न्यासाच्या सल्ल्याने पुढील कार्यवाही केली जाणार आहे. तसेच या स्मारकासाठी लागणारा 100 कोटींचा खर्च सुरुवातीला मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने करायचा आहे. राज्य सरकार त्याची प्रतीपूर्ती करणार आहे.
हे स्मारक दक्षिण मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय आणि नॅशनल गॅलरी ऑफ मॉर्डन आर्ट इमारतीसमोर महात्मा गांधी रस्त्यावरील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौकातील वाहतूक बेटामध्ये हलवण्यात येणार नाही. या जागेवर बाळासाहेब ठाकरे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या प्रस्तावाला मुंबई महापालिकेने मंजुरी दिली आहे, असेही शिंदे यांनी लेखी उत्तरात स्पष्ट केले आहे.
हेही वाचा -यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन करून विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात