मुंबई -राज्यात कोरोना रुग्णांवर आयुर्वेदिक-युनानी-होमिओपॅथी उपचार पध्दतीनेही उपचार करण्यात येत आहे. त्यातही रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आयुष औषधांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. पण कोरोनावर आयुष उपचार करण्यासाठी निधी कमी पडत आहे. अशावेळी राज्य सरकारकडे नॅशनल आयुष मिशनचा सुमारे 50 कोटींचा निधी पडून असल्याची माहिती समोर आली आहे. तेव्हा या निधीचा वापर आता कोरोनावरील आयुषच्या औषध खरेदीसाठी करावा, अशी मागणी आता राज्याच्या आयुष टास्क फोर्सकडून करण्यात आली आहे.
नॅशनल आयुष मिशनचा 50 कोटींचा निधी 4 वर्षांपासून पडून, कोरोनासाठी वापर करण्याची मागणी
नॅशनल आयुष मिशनचा 50 कोटींचा निधी मागील चार वर्षांपासून राज्य सरकारकडे पडून असून ही रक्कम सुमारे 50 कोटींच्या घरात आहे. तेव्हा या निधीचा वापर आता कोरोनावरील आयुषच्या औषध खरेदीसाठी करावा, अशी मागणी राज्याच्या आयुष टास्क फोर्सकडून करण्यात आली आहे.
कोरोनावर आयुष उपचार पद्धतीने उपचार करण्यासाठी 'आयुष टास्क फोर्स' तयार करण्यात आले आहे. मंगळवारी केंद्रीय आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा यांनी नुकतीच टास्क फोर्सशी ऑनलाईन चर्चा केली. यावेळी आयुष औषध खरेदीसाठी निधी खुपच अपुरा पडत आहे. सेवाभावी संस्थांच्या मदतीने आतापर्यंत औषधे खरेदी करण्यात आली. पण, यापुढे मात्र आयसीयूमधील रुग्णांनाही आयुष औषधे देण्यात येणार आहेत. तेव्हा ही औषधे आणखी महाग असतील. संस्थांच्या माध्यमातून ही मदत मिळवणे अशक्य आहे. त्यात राज्य सरकारकडून कोरोनासाठी निधी मिळालेला नाही. तेव्हा आर्थिक अडचणी कशा सोडवायच्या यावर यावेळी चर्चा झाली. टास्क फोर्सच्या सदस्या डॉ. शुभा राऊळ यांनी नॅशनल आयुष मिशनच्या निधीचा मुद्दा समोर आणला.
मागील चार वर्षांपासून हा निधी वापराविना राज्य सरकारकडे पडून असून ही रक्कम सुमारे 50 कोटींच्या घरात आहे. तेव्हा कोरोनाच्या संकटात या रकमेचा वापर व्हावा, अशी मागणी राज्याच्या आयुष टास्क फोर्सकडून करण्यात आली आहे. हा निधी कोरोनासारख्या महामारीत कामाला यावा असे म्हणत हा निधी देण्याची मागणी केल्याची माहिती डॉ. राऊळ यांनी दिली आहे. हा निधी मिळाला तर अनेक चांगल्या-चांगल्या औषधांची खरेदी करता येईल आणि रुग्णांवर उपचार करता येतील. त्यानुसार या मागणीला यावेळी सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला असून हा निधी उपलब्ध होण्याची शक्यता असल्याचे ही डॉ. राऊळ यांनी सांगितले आहे.