महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रुग्णालयाच्या नावाने होणारी ८४२ झाडांची कत्तल वृक्ष प्राधिकरण सदस्यांनी रोखली - 842 tree cutting for hospitals in kandivali mumbai

शताब्दी रुग्णालयाच्या जागी सुपरस्पेशालिटी रुग्णालय उभारले जाणार आहे. या इमारतीच्या बांधकामात ८४२ झाडांचा अडथळा ठरत असल्याने प्रशासनाने ही झाडे कापण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवला होता.

authority members stop 842 tree cutting
मुंबई महापालिका

By

Published : Nov 28, 2019, 8:41 AM IST

मुंबई -कांदिवली येथे महापालिकेच्या शताब्दी रुग्णालयाचे बांधकाम केले जाणार आहे. या इमारतीच्या बांधकामामध्ये ८४२ झाडांचा अडथळा येत असल्याने ती तोडण्याचा प्रस्ताव वृक्ष प्राधिकरण समितीत मंजुरीसाठी सादर करण्यात आला होता. मात्र, मंगळवारी झालेल्या वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत रुग्णालय बांधले जाणार त्या ठिकाणी ही झाडे नसल्याचे निदर्शनास आणले. त्यामुळे झाडांची होणारी कत्तल रोखल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष व वृक्ष प्राधिकरण सदस्य यशवंत जाधव यांनी दिली. यावेळी झाडे छाटणीसाठी दिलेले ५० कोटी गेले कुठे? असा प्रश्न उपस्थित करत वृक्ष अधिकारी या पदावर नवीन अधिकारी नेमावा, अशी मागणी जाधव यांनी केली.

स्थायी समिती अध्यक्ष व वृक्ष प्राधिकरण सदस्य यशवंत जाधव

शताब्दी रुग्णालयाच्या जागी सुपरस्पेशालिटी रुग्णालय उभारले जाणार आहे. या इमारतीच्या बांधकामात ८४२ झाडांचा अडथळा ठरत असल्याने प्रशासनाने ही झाडे कापण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवला होता. मात्र, ज्या ठिकाणी इमारतीचे बांधकाम केले जाते आहे, तेथे झाडेच नाहीत. ही झाडे त्याच परिसरात दुसऱ्या ठिकाणी आहे. त्यामुळे इमारतीच्या बांधकामात या झाडांचा अडथळा ठरत नसल्याचे सदस्य यशवंत जाधव यांनी समोर आणले. इमारतीच्या ठिकाणी झाडेच नसताना दुसऱ्या ठिकाणची झाडे दाखवून हा प्रस्ताव आणल्याने सदस्यांनी प्रशासनाला फैलावर घेतले. यंदा मुंबईत २० हजार झाडे लावली जाणार होती. मात्र, मोकळी जागा नाही, असे कारण सांगून त्यातील १० हजार झाडे अद्याप लावण्यात आलेली नाही. असे असताना रुग्णालयाच्या नावाखाली प्रस्ताव आणून झाडे कापण्याचा हा प्रशासनाचा डाव असल्याचा आरोप जाधव यांनी केला. इमारत उभी करण्याच्या ठिकाणी झाडे नसताना प्रस्ताव कशासाठी आणला, असा सवालही सद्स्यांनी विचारला. मात्र, प्रशासनाला त्याचे समाधानकारक उत्तर देता आले नाही. त्यामुळे रुग्णालयाच्या नावाखाली तब्बल ८४२ झाडे कापण्याचा प्रशासनाने आणलेला हा प्रस्ताव सदस्यांनी रोखला आहे.

हे वाचलं का? - कनिष्ठ अभियंता परीक्षेचे महानगरपालिकेत पडसाद; प्रशासनाला धरले धारेवर

झाडे पुनर्रोपण करण्यासाठी २५ हजार रुपये अनामत रक्कम -

झाडांचे पुनर्रोपण करण्यासाठी पालिकेकडे ६ हजार रुपये अनामत रक्कम ठेवावी लागते. ती १ लाख रुपये करावी, अशी मागणी शिवसेनेचे सचिन पडवळ यांची होती. मात्र, ही रक्कम २५ हजार रुपये करावी, असा प्रस्ताव यशवंत जाधव यांनी मांडला. त्याला प्राधिकरणाने मंजुरी दिली.

हे वाचलं का? -जनतेला नव्या सरकारकडून 'या' अपेक्षा...

झाडांच्या छाटणीसाठीचे ५० कोटी गेले कुठे? -


यंदा झाडांच्या छाटणीसाठी ५० कोटी रुपये देण्यात आले. मात्र, मुंबईत झाडांची फारशी छाटणी झालेली दिसलीच नाही. मात्र, तरीही कंत्राटदारांची बिले मंजूर कशी करण्यात आली? असा सवाल जाधव यांनी विचारला. ५० कोटी रुपये गेले कुठे? याची चौकशी व्हावी, अशी मागणी वृक्ष प्राधिकरण सदस्य यशवंत जाधव यांनी केली. हेच कंत्राटदार रस्त्यावर दुभाजक लावण्याचे व त्याच प्रकारचे इतरही कामे करतात. अशाच कंत्राटदारांना कामे दिली जात आहेत. कंत्राटदारांची ही मक्तेदारी मोडून इतर कंत्राटदारांना कामे दिली जावीत, अशी मागणीही जाधव यांनी केली.

हे वाचलं का? - उद्धव ठाकरे आज घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ; शिवाजी पार्कवर सोहळ्याची जय्यत तयारी

नवीन उद्यान अधीक्षकाची नियुक्ती करा -


वृक्ष अधिकारी ही दोन्ही पदे एकाच व्यक्तीकडे आहे. त्यामुळे परीरक्षण व इतर कामे समाधानकारक होत नाहीत. दोन्ही कामे अर्धवट राहतात. त्यामुळे ही पदे वेगवेगळी करावी. वृक्ष अधिकाऱ्याच्या जागी नवीन अधिकारी नियुक्त करावा, अशी मागणी सदस्यांनी केली.

ABOUT THE AUTHOR

...view details