मुंबई - राज्यात गेले सव्वा महिने सुरू असलेला सत्तेचा पेच सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर सुटलेला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री, तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखाली महाविकासआघाडीचे सरकार स्थापन होत आहे. नव्या सरकारकडून सामान्य नागरिकांच्या काय अपेक्षा आहेत? हे ईटीव्ही भारतने जाणून घेतले आहे.
हेही वाचा - माजी मुख्यमंत्री, अजित पवारांसह 282 आमदारांनी घेतली शपथ
बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संविधान आणि विचारानुसार लोककल्याणकारी राज्य निर्माण व्हावे, लोकांचा आरोग्य, शिक्षण आणि निवाऱ्याचा प्रश्न सुटावा. लोकांचा सरकार आणि प्रशासनावरचा विश्वास उडाला आहे. सत्याला आतापर्यंत कोणी न्याय दिलेला नाही. आताचे सरकार शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सत्तेवर आले आहे. यामुळे शिवाजी महाराजांप्रमाणे सत्याच्या बाजूने उभे राहून न्याय द्यावा, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा - सुप्रिया सुळे यांनी सर्व आमदारांचे केले स्वागत, पाहा व्हिडिओ
वयोवृद्धांना निवृत्तीनंतर योग्य प्रमाणात पेन्शन मिळत नाही. दोन वेळचे अन्न मिळावे म्हणून निवृत्तीनंतर पुन्हा नोकरी करावी लागते. त्यामुळे वयोवृद्धांना पेन्शन देऊन दोन वेळचे अन्न मिळेल, याकडे सरकारने लक्ष द्यावे. महागाई वाढत आहे ही महागाई कमी कशी होईल. याकडेही नव्या सरकारने लक्ष द्यावे. आर्थिक मंदीमुळे बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. नव्या नोकऱ्या मिळत नसल्याने बेरोजगारांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्याचे काम सरकारने करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.