मुंबई -लॉकडाऊन असतानाही मुंबई उपनगरातील शिवाजीनगर भागात काही नागरिक 1 एप्रिल रोजी रात्री रस्त्यावर फिरत होते. ही बाब गस्तीवर असणाऱ्या पोलीस पथकाच्या लक्षात आली. त्यानंतर पोलिसांनी लोकांना रस्त्यावरुन फिरत असल्यामुळे हटकले. याचाच राग आल्याने संबंधीत टोळक्याने पोलिसांच्या पथकावर लाकडी बांबूने हल्ला केला. या हल्ल्यात एक पोलीस कर्मचारी जखमी झाला. यानंतर पोलिसांनी 4 लोकांवर गुन्हा दाखल केला असून वाजीद शेख आणि सलमान सुली या दोघांना अटक केली आहे.
हेही वाचा...संतापजनक..! तपासणीसाठी गेलेल्या डाॅक्टरांवर इंदौरमध्ये दगडफेक
कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन आणि संचार बंदी लागू आहे. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडू नका, असे पोलीस प्रशासनाकडून वारंवार सांगितले जात आहे. यासाठी पोलिसांकडून काही ठिकाणी रात्री गस्त घालण्यात येत आहे.
कोरोनाचे संकट मोठे आहे. तरिही पोलीस, आरोग्य सेवा देणारे कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता कर्तव्य पार पाडत आहेत. मात्र, काही नागरिक घरात बसण्याचे आवाहन करून देखील त्याकडे दुर्लक्ष करत बाहेर पडत आहेत. तर काहीवेळा हे समाजकंटक पोलीस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर हात उगारत असल्याचे दिसून येत आहे. मुंबई उपनगरातील शिवाजीनगर, गोवंडी परिसरात कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पोलीस अनावश्यकरित्या रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांवर कारवाई करत होते. मात्र, तिथेही टोळक्याने पोलिसांवर हल्ला केल्याची संतापजनक घटना घडली आहे.