मुंबई :पोलीस निरीक्षक असलेले प्रकाश खेतले हे आपल्या पत्नीकडे आत्महत्या करण्याबाबत वारंवार बोलत असल्याची माहिती चुनाभट्टी पोलिसांनी दिली आहे. आत्महत्या प्रकरणी आज चुनाभट्टी पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्रकाश थेतले हे चुनाभट्टी येथील चुनाभट्टी पोलीस वसाहतीतील समर्थ कृपा बिल्डिंगमध्ये पत्नीसह राहत होते. काल मध्यरात्री 1.57 ते सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान राहत्या घरात प्रकाश यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
नैराश्यामुळे आत्महत्या ?मयत यांची पत्नी गीता थेतले (वय 31 वर्षे) यांचा जबाब पोलिसांनी नोंदवला असून त्यांचे लग्न 2015 मध्ये प्रकाश थेतले यांच्यासोबत झाले होते. त्यांना अजून मूलबाळ नाही तसेच मयत प्रकाश यांना दारू पिण्याचे व्यसन होते. ते सतत नैराश्यामध्ये असायचे आणि कामावर वारंवार गैरहजर राहत असत. आत्महत्या करण्याबाबत नेहमी पत्नीशी बोलणे होत असे. त्यांनी पत्नी बेडरूममध्ये झोपलेली असताना त्यांनी बेडरूमला बाहेरून कडी लावून हॉलमध्ये गळफास घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली. सध्या त्यांचा कोणावरही संशय अथवा तक्रार नाही. मृतदेह शवविच्छेदनानंतर नातेवाईकांच्या ताब्यात पुढील विधीसाठी देण्यात आला असल्याची माहिती चुनाभट्टी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देसाई यांनी दिली आहे.