मुंबई -सर्वोच्च न्यायालयाने बारा आमदारांच्या निलंबनाचा विधिमंडळाचा निर्णय रद्दबादल ठरवल्यानंतर आता विधानमंडळ आणि न्यायपालिका यांच्यातला संघर्ष तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय विधिमंडळाला लागून असल्याचा दावा माजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील 12 आमदारांच्या निलंबनाचा विधिमंडळाचा निर्णय चुकीचा ठरवत रद्द केला आहे. मात्र, विधानमंडळाने घेतलेला कोणताही निर्णय कोणत्याही न्यायालयाला रद्द करता येत नाही, अशी भूमिका माजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole on MLAs Suspension Cancellation ) यांनी घेतली आहे.
विधानसभेचा ठराव एकमताने - पटोले
यासंदर्भात नाना पटोले यांना विचारले असता ते म्हणाले, "मी विधानसभा अध्यक्ष असताना एकमताने ठराव संमत केला की इतर उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय निर्णय हे विधिमंडळाच्या आवारात लागू होऊ देणार नाही. त्या ठरावाला सर्व सभागृहाने एकमताने मंजुरी दिली आहे त्यामध्ये विरोधकांचाही सहभाग आहे. त्यानुसार निर्णय घेणे हे सध्याच्या अध्यक्षांचे काम आहे. ते काय निर्णय घेतात हा त्यांच्या अखत्यारीतला प्रश्न असेल, असेही सूचक विधान पटोले यांनी केले. मी विधानसभा अध्यक्ष असतो तर काय केलं असतं हे देशाला दिसलं असतं, असेही ते म्हणाले.
डिजिटल सदस्यता नोंदणी -