मुंबई - मध्य गोदावरी उपखोऱ्यातील १९.२९ टीएमसी अतिरिक्त पाणी वापरास जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मान्यता दिली. गोदावरी पाणी तंटा लवादातील तरतूदीच्या अधीन राहून पाणी वापरास परवानगी देण्यात आली आहे.
पाणी वापराचे नियोजन
गोदावरी खोऱ्यात १९७५ च्या आधी पाणी वापर केलेला होता. त्यामध्ये पूर्वीच्या मंजूर पाणी वापरात काही त्रुटी होत्या. त्या त्रुटी महाविकास आघाडी शासनाच्या जलसंपदा विभागाने आता दूर केल्या आहेत. या त्रुटी दूर केल्यामुळे आता मध्य गोदावरी उपखोऱ्यातील टीएमसी पाणी वापराचे नियोजन करणे शक्य आहे. त्यानुसार १९.२९ टीएमसी अतिरिक्त पाणी वापरास गुरुवारी मंत्री पाटील यांनी मान्यता दिली आहे. आता १९.२९ टीएमसी पाणी वापर मंजूर झाला आहे. याचा अर्थ पूर्वीचे ६० टीएमसी आणि आताचे ६१.२९ टीएमसी म्हणजे १२१.२९ टीएमसी पाण्याचा वापर मध्य गोदावरी खोऱ्यातून मराठवाड्याला करता येणार आहे. यापूर्वी ६ ऑक्टोबर १९७५ पूर्वीच्या मंजूर प्रकल्पांचा पाणी वापर संरक्षित असून त्यानंतर ६० टीएमसी पाणी वापरास मान्यता दिलेली होती.