मुंबई - गंभीर आजाराच्या रुग्णांना आणि त्यांच्यासोबत नातेवाईकांना उपचारासाठी रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले.
गेल्या सहा महिन्यांच्या कोरोना लॉकडाउनच्या कालावधीत क्षयरोग, कर्करोग, यकृत, मूत्रपिंड, मेंदूविकार, अर्धांगवायू, मधुमेहासारख्या गंभीर आजाराने त्रस्त असणाऱ्या रुग्णांना उपचार घेण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशातच कोरोनामुळे सर्वसामान्यांची आर्थिक घडी विस्कटलेली आहे. या आजारांवरील उपचारांचा खर्च लाखोंच्या घरात असतो. सध्या रुग्णांना उपचाराबरोबरच प्रवास खर्चाला तोंड द्यावे लागत आहे. रुग्णालयात जाण्याासाठी अनेक जण सार्वजनिक वाहतूकीचा वापर करतात. ग्रामीण भागातील रुग्णांनाही उपचारासाठी शहरात जावे लागते. मात्र, असे अनेक आजार आहेत ज्यांच्या उपचारासाठी रुग्णांना आठवड्यातून दोन-तीन वेळा प्रवास करावा लागतो. डायलिसिसचा 300 ते 500 रुपये खर्च रुग्णांना परवडत नाही, त्यातच रुग्णालयात जाण्यासाठी 1 हजार ते 1500 रुपये खासगी वाहनाला द्यावे लागतात.