मुंबई- मराठी माणूस हा नाट्यवेडा आहे हे अनेकदा आपण अनुभवलं आहे. चित्रपट, त्यानंतर आलेल्या टीव्ही मालिका आणि आता ओटीटीचं आकर्षण असतानाही मराठी माणसांचं नाटकावरचं प्रेम तसूभरही कमी झालेलं नाही. मुंबईच्या रंगमंचावर सादर होणारी नाटकं ही नाट्य रसिकांसाठी मोठी पर्वणी असते. नाटकाचे रसिक प्रेक्षक येणाऱ्या नाटकांची यादी आणि सध्या सुरु असलेल्या नाटकांची माहिती शोधत असतो. अर्थात वृतपत्राच्या माध्यमातून झळकणाऱ्या वेगवेगळ्या नाटकाच्या जाहिरातीतून त्याच्यापर्यंत ही माहिती पोहोचत असते. मात्र एका वृतपत्रात नाटकाबद्दलची एक अनोखी जाहिरात झळकली आणि नाटक रसिकामध्ये चर्चा रंगू लागली आहे.
1 जानेवारी पासून श्री शिवाजी मंदिर दादर येथे या नाटकांचे प्रयोग होणार नाहीत, याची रसिकांनी नोंद घ्यावी, अशा आशयाची ही जाहिरात आहे. यामुळे नाट्य रसिक बुचकळ्यात पडले आहेत. जाहिरातीमध्ये साधारणपणे 22 नाटकांचे यादी देण्यात आली आहे. याविषयी अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांची प्रतिक्रिया घेतली. "आपण नाट्य संमेलन बैठकीच्या नियोजनाच्या गडबडीत असून तुम्ही दिलीप जाधव यांच्याशी संपर्क साधावा", असे दामले यांनी म्हटले आहे.
दिलीप जाधव यांनी मांडली नाट्य निर्मात्यांची व्यथा - वृत्तपत्रात जाहिरात आम्ही दिली असल्याची माहिती अष्टविनायक संस्थेचे दिलीप जाधव यांनी दिली आहे. त्या जाहिरातीमधील 7 नाटकं आपल्या संस्थेच्या असून 4 नाटकं अभिनेता निर्माते प्रशांत दामले यांची देखील आहेत. या नाटकांचे प्रयोग शिवाजी नाट्य मंदिरात रसिकांना पाहायला मिळाले नाहीत तर ते नाराज होतील याची खबरदारी म्हणूनच आम्ही ही जाहिरात दिली असल्याचं, दिलीप जाधव यांनी म्हटले आहे. श्री शिवाजी मंदिर ट्रस्टच्या वतीने करण्यात आलेले सर्व आरोप जाधव यांनी फेटळून लावले आहेत. मी कोणत्याही प्रकारच्या तिकिटाचे दर वाढवलेले नाहीत. नाट्यगृहाच्या कोणत्याही प्रकारच्या नियमांचे उल्लंघनही केलेलं नाही. एखादे वेळेस काही कारणास्तव नाटकातील कलाकार उपलब्ध नसल्याने त्याचा शो रद्द करण्यात येतो, अशावेळी नाट्यगृहाचे भाडे देणे बंधनकारक असते. त्यामुळे अशा परिस्थितीत एखाद्या निर्मात्या सोबत चर्चा करून नाटकाच्या प्रयोगासाठी समन्वयाने तारखेची आदल बदल करत असतो, असे दिलीप जाधव यांनी सांगितले.
नाटकांचे निर्माते नियमांचे उल्लंघन करतात, सुधीर सावंतांची तक्रार - आम्ही नाटकाच्या प्रयोगाच्या तारखांचे तीन महिने आधी वाटप करीत असतो. त्यानंतर नाटकाचे निर्माते ऐनवेळी प्रयोग रद्द करतात. प्रेक्षक,थिएटर आणि निर्माते यांचे वेगवेगळे प्रॉब्लेम असतात. आम्ही करोना काळापासून भाडे देखील कमी केले आहे. तरी देखील निर्माते नाट्य प्रयोगाच्या तिकिटाचे दर जास्त लावत असल्याची तक्रार प्रेक्षकांनी केली आहे. या सर्व गोष्टींना आळा घालण्यासाठी जर नाटकाचे तिकीट 500 रुपये केले तर आम्ही दिड पट भाडे लावले. नाटकाचे निर्माते प्रयोगाच्या तारखा घेतात आणि दुसऱ्याला देतात. नियमानुसार वागत नाहीत. याबाबत बैठकदेखील घेतली होती. त्यातील काहो लोकांकडून आम्हाला कोंडीत पकडण्याचे प्रकार सुरु केल्याचा आरोप श्री शिवाजी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सुधीर सावंत यांनी केला आहे.