मुंबई - सोशल माध्यमांवर राजनैतिक पोस्ट का केली, असा जाब विचारत 8 ते 10 जणांच्या टोळक्याने एका सेवानिवृत्त नौदलाच्या अधिकाऱ्याला मारहाण केल्याचे समोर आले होते. मुंबईतील कांदिवली पूर्व येथे राहणाऱ्या मदन काशिनाथ शर्मा यांनी त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर सोनिया गांधी व शरद पवार यांच्या फोटोला नमस्कार करणारा उद्धव ठाकरे यांचा फोटो फॉरवर्ड केला होता. तेव्हा त्या ऑफिसरला मारहाण करण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणात काल (शुक्रवार) रात्री 6 जणांना अटक केली होती. त्या सर्वांना आज जामीन मंजूर करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण -
मदनलाल काशिनाथ शर्मा यांनी 9 सप्टेंबर रोजी त्यांच्या मोबाईलवर आलेली एक पोस्ट दुसऱ्या व्हॉट्सअप ग्रुपवर फॉरवर्ड केली. तेव्हा त्यांना कमलेश कदम नावाच्या इसमाचा फोन आला. तुम्ही कुठे राहता तुमच्या घरचा पत्ता काय ? असे या सेवानिवृत्त नौदलाच्या अधिकाऱ्याला विचारल्यानंतर शर्मा यांनी त्यांच्या घरचा पत्ता कमलेश कदम या व्यक्तीला दिला. 11 सप्टेंबर रोजी शर्मा यांच्या घराबाहेर आठ ते दहा जणांचे टोळके जमले आणि मदन शर्मा यांना संपर्क साधून त्यांना सोसायटीच्या गेटवर बोलावण्यात आले. त्यानंतर त्या टोळक्याने शर्मा यांना मारहाण केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पोस्ट दुसऱ्या ग्रुपमध्ये फॉरवर्ड का केली, असा जाब विचारत त्या टोळक्याने शर्मा यांना बदडले.
मारहाणीत मदन शर्मा यांच्या डोळ्याला इजा झाली आहे. याशिवाय त्यांना मुका मार लागला आहे. यासंदर्भात शर्मा यांनी समता नगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवला होता. तेव्हा पोलिसांनी 6 जणांना अटक केली होती. त्या सर्वांना आज जामीन मंजूर करण्यात आला आहे.
हेही वाचा -धक्कादायक...! कोरोनामुक्त झाल्यानंतर ५ ते १० टक्के रुग्णांवर होतोय 'हा' परिणाम