महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Diwali: कोरोना काळानंतर फटाक्यांचा कडेलोट, अनेक ठिकाणी आगीच्या घटना; वाचा सविस्तर

मुंबईमध्ये दरवर्षी दिवाळीत आगी लागण्याच्या घटना घडतात. २२ ते २४ ऑक्टोबर या ३ दिवसांत एकूण ८५ आगीच्या घटना नोंद झाल्या आहेत. त्यापैकी ३७ आगी या फटाक्यांमुळे लागल्या आहेत. शनिवार पेक्षा रविवारी आणि सोमवारी सर्वाधिक आगी लागण्याच्या घटना नोंद झाल्या आहेत. तर फटाक्यांमुळे सर्वाधिक आगी सोमवारी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी नोंद झाल्या आहेत. मुंबईकरांनी आगी लागणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन मुंबई अग्नीशमन दलाकडून करण्यात आले आहे.

फटाक्यांमुळे अनेक ठिकाणी आगीच्या घटना
फटाक्यांमुळे अनेक ठिकाणी आगीच्या घटना

By

Published : Oct 25, 2022, 5:10 PM IST

मुंबई - मुंबईत शनिवार पासून दिवाळी सण साजरा केला जात आहे. शनिवारी २२ ऑक्टोबरला १७ आगीच्या घटना नोंद झाल्या त्यापैकी २ आगी फटाक्यामुळे लागल्या. रविवारी २३ ऑक्टोबरला २७ आगीच्या घटना नोंद झाल्या त्यापैकी ७ आगी फटाक्यामुळे लागल्या. सोमवारी २४ ऑक्टोबरला ४१ आगीच्या घटना नोंद झाल्या त्यापैकी २८ आगी फटाक्यामुळे लागल्या. दीपावली दरम्यान दरवर्षी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी सर्वाधिक आगीच्या घटना नोंद होतात. यंदाही सोमवारी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी सर्वाधिक आगी लागण्याच्या घटना नोंद झाल्या आहेत. गेल्या तीन दिवसात आगी लागण्याच्या घटना नोंद झाल्या असल्या तरी त्यात कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे.

मागील वर्षी १५९ आगीच्या घटनांची नोंद -गतवर्षी (२०२१) दीपावली सणाच्या दरम्यान तब्बल १५९ आगीच्या घटनांची नोंद झाली होती. त्यापैकी ४१ आगी फटाक्यांमुळे लागल्या होत्या. तर मागील वर्षी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी ६५ आगीच्या घटना नोंद झाल्या त्यापैकी ५० टक्के म्हणजेच ३३ आगी फटाक्यांमुळे लागल्या होत्या. दिवाळीत लागलेल्या आगीच्या घटनांमध्ये २०१६ मध्ये लागलेली आग सर्वात मोठी होती. लोअर परळच्या कर्मशिअल कॉम्प्लेक्समध्ये फटाक्यांमुळे लागलेल्या आगीच्या भक्ष्यस्थानी चार मजले जळून खाक झाले होते. परंतु, सर्व कार्यालयांना सुट्टी असल्याने या घटनेत कोणीही जखमी किंवा मृत्यूमुखी झालेले नाही.

काळजी घेण्याचे पालिकेचे आवाहन -दीपावलीचा सण साजरा करताना नागरिकांनी योग्य दक्षता बाळगावी विशेषतः फटाके फोडताना लहान मुलांची अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. आग अथवा तत्सम प्रसंग उद्भवल्यास तात्काळ क्रमांक १०१ किंवा नागरी मदत सेवा संपर्क क्रमांक १९१६ यावर संपर्क साधावा, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केले आहे. दरवर्षी अत्यंत उत्साहात दीपावली सण साजरा केला जातो. दीपोत्सव साजरा करीत असतांना फटाक्यांची आतषबाजी, दिव्यांची सजावट तसेच विद्युत रोशणाई केली जाते. काहीवेळा उत्साहाच्या भरात नकळत आगीच्या दुर्घटनांना निमंत्रण दिले जाते. त्यामुळे काळजी घ्या असे आवाहन मुंबई अग्नीशमन दलाचे प्रमुख हेमंत परब यांनी केले आहे.

तीन दिवसातील आगीच्या घटना -लोअर परेल गणपतराव कदम मार्ग येथील ए टू झेड इंडस्ट्रियल इस्टेट मधील एका गाळ्याळा रविवारी २३ ऑक्टोबरला रात्री ११ च्या सुमारास आग लागली. गोरेगाव पूर्व येथील मोहन गोखले मार्गावर गोकुळ धाम जवळ धीरज व्हॅली इमारत क्रमांक २ ही इमारत आहे. या इमारतीच्या सातव्या मजल्यावर सोमवारी २४ ऑक्टोबरला रात्री साडे नऊच्या सुमारास आग लागली. तर आज सोमवारी २५ ऑक्टोबरला सकाळी ७.३३ वाजता साकीनाका कुर्ला पश्चिम खैरानी रोड येथील बार्डन गल्लीत असलेल्या गोडाऊनला आग लागली.

फटाके फोडताना अशी घ्या काळजी -
१. फटाके फोडतांना सुती कपडे परिधान करावेत.
२. फटाके मुलांपासून लांब ठेवावेत व फोडतांना मोठ्या व्यक्तिंनी सोबत रहावे.
३. फटाके फोडतांना नेहमी पादत्राणे वापरावीत.
४. फटाके लावतांना पाण्याने भरलेली बादली जवळ ठेवावी व भाजल्यास तात्काळ भाजलेल्या ठिकाणी भरपूर स्वच्छ पाणी ओतावे.
५. फटाके फोडण्यासाठी अगरबत्ती व फुलबाजाचा वापर करावा.

फटाके फोडताना या गोष्टी टाळा -
१. इमारतीच्या आत व जिन्यावर फटाके फोडू नयेत.
२. फटाके पेटवण्यासाठी आगकाडी अथवा लायटरचा थेट वापर करु नये.
३. झाडे, ओव्हरहेड विद्युत तार किंवा उंच इमारतीजवळ हवेत उडणारे फटाके फोडू नयेत.
४. खिडक्यांच्या पडद्याजवळ पणत्या / दिवे लावू नयेत.
५. विजेच्या तारा, गॅस पाईपलाईन किंवा पार्किंगच्या ठिकाणी फटाके फोडू नयेत.
६. इमारतीला रोषणाई करतांना विद्युत तारांची जोडणी ओव्हरलोड करू नये, सैल जोडणी टाळावी.

ABOUT THE AUTHOR

...view details