मुंबई - राज्यात कोरोना विषाणूचे आणखी ३ नवीन रुग्ण आढळले असून राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ५२ वर पोहोचली असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यात मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये प्रत्येकी १ नवीन रुग्ण आढळून आला आहे. या ३ नवीन रुग्णांमुळे राज्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ही ५२ वर गेली आहे. राज्यातील १ हजार ३६ जणांना त्यांच्या ट्रॅवल हिस्ट्रीनुसार निरीक्षणाखाली ठेवण्यात आले होते. त्यातील ९७१ जणांची तपासणी केली असता त्यांचा अहवाल निगेटिव्ह आले आहेत. काल आणखी ५ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून त्यांना आज (शुक्रवार) डिस्चार्ज मिळणार आहे. मात्र, पुढील १४ दिवस ते निरीक्षणाखाली राहतील, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
कोरोना बाबतची माहिती देताना आरोग्य मंत्री राजेश टोपे
याचा अर्थ कोरोनाचे रुग्ण बरे होतात, त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जाऊ नये. या सर्व रुग्णांचा खर्च महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकारकडून केला जाईल. कोरोना पार्श्वभूमीवर आता आपण 6 लॅबमध्ये टेस्ट करत आहोत, येणाऱ्या दिवसात ही संख्या 12 होईल, असे टोपे म्हणाले.
कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी राज्यातील डॉक्टर्स हे त्यांचा जीव धोक्यात घालून काम करत आहेत. रत्नागिरीमधील डॉक्टरांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आली आहेत. तरीही हे डॉक्टर्स न घाबरता रिस्क घेऊन मानवतेचे काम करत आहेत. त्यांना सुरक्षेचे सर्व साधन उपलब्ध करून देण्यात आले असल्याचे टोपे यांनी सांगितले.
मुंबईत क्वारंटाइनची सुविधा वाढवण्याचे काम सुरू आहे. खासगी रुग्णालयातही क्वारंटाइनची व्यवस्था करण्यात येईल असे ते म्हणाले. राज्यात कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, नागरिकांनी गर्दी टाळावी. आत्ता कोरोना संसर्ग दुसऱ्या टप्प्यात आहे, तो तिसऱ्या टप्प्यात जाऊ नये यासाठी उपाय योजना आखण्यात येत आहेत. प्रसंगी कठोर निर्णय घेतले जातील असेही ते म्हणाले.
देशातील कोरोनाबाधितांची संख्या ही १९५ वर पोहोचली आहे. १६३ भारतीय आणि ३२ परदेशी व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. पंतप्रधान मोदी यांनी गुरुवारी कोरोना पार्श्वभूमीवर २२ मार्चला जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. त्याला नागरिकांनी पूर्ण प्रतिसाद द्यावा. या आजारातून मुक्त होण्यासाठी नागरीकांनी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.
हेही वाचा -पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एक दिवस बंदच्या आवाहनानंतर मुंबईकरांच्या प्रतिक्रिया..