मुंबई - गेल्या ८० दिवसांपासून संपावर ठाम असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना वारंवार कामावर येण्याचे ( ST Workers Strike ) आवाहन करुन देखील कर्मचारी कामावर येत नसल्याने मोठ्या प्रमाणात नागरिकांची गैरसोय होत आहे. स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( NCP Chief Sharad Pawar ) यांनी सुद्धा कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे आवाहन केले होते. तरीसुद्धा कर्मचारी संपावर ठाम असल्याने महामंडळाने पुन्हा एकदा जोरदार कारवाई सुरू केली आहे. आज महामंडळाने २४७ निलंबित कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले असून आता बडतर्फ कर्मचाऱ्यांची संख्या २ हजार ७२२वर पोहोचली आहे. ( 2722 ST Workers Dissmissed )
२ हजार ७२२ बडतर्फ -
एसटी महामंडळ विलिनीकरणाच्या मागणीवरुन सुरू असलेला संपामुळे सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. महामंडळाने कामगारांना अंतरिम वेतनवाढ, निलंबन आणि बडतर्फीची कारवाई करुनसुद्धा कर्मचारी आंदोलन मागे घेत नाही आहे. या संपावर तोडगा निघावा, यासाठी शरद पवार यांनीदेखील प्रयत्न केले. एसटी कर्मचाऱ्यांच्या २२ संघटनांसोबत (दहा जानेवारीला) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी चर्चा केली. या बैठकीनंतर एसटी कृती समितीच्या सदस्यांनी पुन्हा एकदा एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर रूजू व्हावे, असे आवाहन केले. मात्र, तरीसुद्धा कर्मचारी संपावर ठाम असल्याने आता महामंडळाने जोरदार कारवाई सुरू केली आहे. महामंडळाने आज २४७ निलंबित कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले असून आता बडतर्फ कर्मचाऱ्यांची संख्या २ हजार ७२२ वर पोहोचली आहे. ४ हजार ९०५ कर्मचाऱ्यांना बडतर्फीची कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.