मुंबई - मुंबईमधील कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीत सोमवारी तब्बल ८५ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे महापालिका आणि आरोग्य विभागाची चिंता वाढली होती. असे असताना आज रुग्णसंख्येत घट झाल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. धारावीत २४ तासांत २६ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंत येथील रुग्णांची संख्या १ हजार ३५३वर पोहोचली असून, ५६ जणांचा मृत्यू झाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून धारावीतील रुग्णांची संख्या दोन ते तीन पटीने वाढली होती. धारावी ही दाटीवाटीची वस्ती असल्याने येथे कोरोना संसर्ग झपाट्याने पसरत आहे. येथील वाढत्या संसर्गावर नियंत्रणासाठी पालिकेच्या आरोग्य यंत्रणेने कंबर कसली आहे. घरोघरी सर्व्हेक्षण, जास्तीत जास्त तपासण्यावर भर, कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन त्यांना तत्काळ क्वारंटाईन करण्यासाठी प्रयत्न, आरोग्य शिबिरे, कंन्टेटमेंट झोनमध्ये पोलीस बंदोबस्त ठेऊन खबरदारी आदी उपाययोजना प्रशासनाकडून राबवल्या जात आहेत. मात्र, तरिही गेल्या काही दिवसांत वाढणारी रुग्णांची आकडेवारी ही चिंतेत भर टाकणारी आहे.