मुंबई :मुंबई शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. वरळीतील फोर सिझन हॉटेलच्या बाजूला बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून दगड पडून दोन जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणी मुंबई पोलिसांकडून घटनेचा पंचनामा सुरू आहे. मृत व्यक्तीचे मृतदेह नायर रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. ही माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत अशी माहिती मिळतेय.
४२ व्या मजल्यावरून दगड कोसळला : वरळी गांधीनगर येथे सुप्रसिद्ध फोर सीजन हॉटेल आहे. या हॉटेलच्या बाजूला फोर सीजन रेसिडेन्सी ४२ मजल्यांची इमारत उभारली जात आहे. इमारतीचे बांधकाम सुरू असताना ४२ व्या बांधकामासाठी वापरण्यात येणारा दगड खाली कोसळला. हा दगड या इमारती खालून जाणाऱ्या दोघ जणांवर कोसळला. यामुळे दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस आणि १०८ ॲम्बुलन्स दाखल झाली.
मृतदेह शवविच्छेदनासाठी :या दुर्घटनेत जखमी झालेल्या दोघांना ॲम्बुलन्समध्ये आणून डॉक्टरांकडून तपासण्यात आले. तपासल्यानंतर डॉक्टरांनी या दोघांचाही मृत्यू झाल्याचे घोषित केले. मृत्यू झाल्याने दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी नायर रुग्णालयात पाठवण्यात आले. या प्रकरणी पोलिसांकडून पंचनामा करण्यात येत आहे. इमारतीचे बांधकाम सुरू असताना दगड कोसळून दोन त्यांचा मृत्यू झाल्याने दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.