महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

याच दिवशी मुंबई ते ठाणे धावली होती आशिया खंडात पहिली रेल्वे, झुकझुकगाडी झाली 168 वर्षांची!

ब्रिटिशांनी भारतात १५० वर्षांपेक्षा जास्तकाळ राज्य केले. याकाळात त्यांनी काही नवीन गोष्टी भारतात सुरू केल्या. त्यामध्ये भारतीय रेल्वेचा समावेश होतो. १६ एप्रिल १८५३ला भारतात आशिया खंडातील पहिली रेल्वेगाडी धावली. आज त्याला १६८ वर्षे होत आहेत. त्याबाबत ईटीव्ही भारतचा हा विशेष रिपोर्ट...

168th Anniversary of Indian Railways
भारतीय रेल्वे १६८वा वर्धापनदिन बातमी

By

Published : Apr 16, 2021, 6:51 AM IST

Updated : Apr 16, 2021, 1:41 PM IST

मुंबई - भारतीय रेल्वे खऱ्या अर्थाने संस्कृती आणि देशाच्या इतिहासाची साक्षीदार आहे. 16 एप्रिल 1853ला आशिया खंडातील पहिली प्रवासी रेल्वे गाडी मुंबई ते ठाणे दरम्यान धावली होती. त्यावेळी देशभरात रेल्वे वाहतुकीची मुहूर्तमेढ रोवली गेली होती.

आज आपली रेल्वे १६८ वर्षांची झाली

अशी धावली पहिली झुगझुग गाडी -

ब्रिटिशांना भारतात कार्यक्षमपणे प्रशासन चालवता यावे, यासाठी 1832 साली भारतात प्रथम रेल्वे वाहतुकीचा आराखडा मांडण्यात आला होता. त्यानंतर ब्रिटिश सरकारने 'ग्रेट इंडियन पेनिंन्सुल' (जी.आय.पी) या कंपनीला मुंबईपासून ते खानदेशाच्या दिशेने 56 किमी लांबीचा रेल्वेमार्ग उभारण्याचे कंत्राट दिले होते. ब्रिटिश सरकारने 14 नोव्हेंबर 1849ला जेम्स जॉन बर्कले या अवघ्या 30 वर्षाच्या ब्रिटिश इंजिनियरवर रेल्वे प्रत्यक्षात साकरण्याची जबाबदारी सोपवली होती. त्यानंतर ऑक्टोबर 1851 मध्ये रेल्वेमार्गाचे भूमिपूजन करण्यात आले. 16 एप्रिल 1853 ला दुपारी 3 वाजून 35 मिनिटांनी मुंबई ते ठाणे दरम्यान आशिया खंडातील पहिली रेल्वेगाडी धावली.

21 तोफांची सलामी -

रेल्वेच्या प्रगतीचा इतिहास खूपच रंजक आहे. 'ग्रेट इंडियन पेनिंन्सुल' (जीआयपी) ही रेल्वे कंपनी नव्या युगाची सुरुवात करणारी ठरली आहे. जेव्हा पहिली रेल्वेगाडी धावली तेव्हा या गाडीला 14 डबे लावण्यात आले होते. या 14 डब्यांसाठी सिंधू, सुलतान आणि साहिब हे तीन महाकाय इंजिन जोडण्यात आली होते. पहिल्या गाडीच्या शुभारंभासाठी ब्रिटिशांनी 400 नागरिकांना निमंत्रण दिले होते. या पहिल्या रेल्वे प्रवाशांमध्ये मुंबईचे शिल्पकार जगन्नाथ शंकर शेठ यांचा समावेश होता. मुंबईत दुपारी 3 वाजून 35 मिनिटांच्या मुहूर्तावर पहिली गाडी सोडण्यात आली होती. त्यावेळी तिला 21 तोफांची सलामी देण्यात आली होती.

जगातील दुसरे आश्चर्यकारक स्थानक मुंबईत -

भारतीय रेल्वेच्या आणि जगाच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचे एक वेगळे महत्व असून या स्थानकावरून आशिया खंडातील पहिली रेल्वे गाडी धावली होती. सध्या संपूर्ण जगाच्या पाठीवर दुसरे आश्चर्यकारक स्थानक म्हणून त्याकडे पाहिले जाते. आधुनिक काळातील स्थापत्यशैलीचा अद्भुत नमुना अशी ओळख असणाऱ्या सीएसएमटी इमारतीला 132 वर्षे झाली आहेत. मे 1878 मध्ये स्थापत्य रचनाकार फ्रेडरिक विल्यम्स स्टीव्हन यांनी जीआयपी रेल्वे कंपनीचे मुख्यालय बांधण्यास सुरुवात केली होती. 20 मे 1888 मध्ये इमारत बांधून पूर्ण झाली होती. त्यावेळी ही इमारत बांधण्यासाठी 16 लाख 14 हजार रुपयांचा खर्च आला होता. इमारतीच्या दर्शनी भागात असलेल्या घडाळाला खाली ब्रिटनच्या राणीचा पुतळा होता. 1950मध्ये तो हटवण्यात आला.

म्युझियममध्ये भारतीय रेल्वेच्या पाऊलखुणा -

सीएसएमटी येथील मुख्यालयाच्या तळमजल्यावर एक छोटेसे हेरिटेज म्युझियम आहे. यामध्ये रेल्वेचा इतिहास सांगणारी माहिती, जुने फोटो, इमारतीचा आराखडा, रेल्वेच्या छोट्या इंजिनांसह अन्य वस्तू आहे. 1853 साली मुंबई ते ठाणे या मार्गावर पहिली रेल्वे धावली तेव्हा पासून रेल्वेमध्ये अनेक बदल झाले. रेल्वे गाड्यांचे डबे, इंजिन यात बदल होत गेले. 1925 मध्ये पहिली विजेवर धावणारी रेल्वे सुरू झाली. ही सगळी ऐतिहासिक चित्रे या हेरिटेज म्युझियममध्ये आहेत. ब्रिटिश काळापासून असलेली कागदपत्रे, रेल्वे गाड्यांचे मॉडेल, जुनी छायाचित्रे यांच्या रूपात आपल्याला रेल्वेचा इतिहास पाहता येतो. जुन्या छायाचित्रांमध्ये पूर्वीच्याकाळी वापरण्यात आलेले टेलिफोन, संदेश वाहनाचे मोर्स यंत्र, भांडी, कंदील, अधिकाऱ्यांचे बॅच, इंजिन आणि डब्या वरील लोगो जुने तिकीट हा खजिनाही येथे जतन करून ठेवण्यात आलेला आहे.

जगातील सर्वात मोठे रेल्वे जाळे -

आतापर्यंत रेल्वे वाहतुकीवर भारतीय रेल्वेचा एकाधिकार आहे. भारतीय रेल्वेची गणना जगातील सर्वात मोठ्या आणि लांब रेल्वेमध्ये केली जाते. 25 लाख कर्मचारी असलेली भारतीय रेल्वे जगातील सर्वात मोठी व्यावसायिक संस्था आहे. जी कर्मचारीसंख्येत फक्त चिनी लष्करापेक्षा लहान आहेत. भारतीय रेल्वेमध्ये 12 हजार 147 इंजिन, 74 हजार 3 प्रवासी डब्बे आणि 2 लाख 89 हजार 185 वाघिणी आहेत. दररोज 8 हजार 702 प्रवासी गाड्यांसहित एकूण 13 हजार 5 23 गाड्या धावतात.

हेही वाचा -संगीतप्रेमी ९३ वर्षीय प्रधानाचार्य करतार सिंग

Last Updated : Apr 16, 2021, 1:41 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details