मुंबई -राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने भीतीचे वातावरण तयार झाले होते. मात्र, मुंबई महानगरपालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नामुळे १२ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. या १२ पैकी ८ रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती पालिकेच्या उप मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शाह यांनी दिली. कोरोनाचे रुग्ण बरे होत असल्याने मुंबईकरांनी घाबरू नये, गर्दीच्या ठिकाणी न जाता घरात राहून आपली काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
मंगळवारी दिवस भरात एकूण ८४१ रुग्णांना तपासण्यात आले. त्यापैकी ९४ संशयित रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. ६० संशयित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. विविध रुग्णालयात १२८ रुग्ण दाखल केले आहेत. मुंबईत मागील २४ तासात नव्याने ५ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यात मुंबईतील ४ आणि मुंबई परिसरातील १ रुग्णाचा समावेश आहे. यामुळे मुंबई परिसरातील रुग्णांची एकूण संख्या ५८ झाली आहे. सोमवारपर्यंत मुंबई परिसरात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५३ होती. आत्तापर्यंत मुंबईमधील २ आणि मुंबई बाहेरील २ अशा ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, असे पालिकेच्या आरोग्य विभागाने म्हटले आहे. होम क्वारेंटाईन रुग्णांसाठी सुरू केलेल्या होम टेस्टिंगसाठी ३० डॉक्टरची नेमणूक करण्यात आली आहे. या डॉक्टरांनी १ हजार २०० होम क्वारेंटाईन प्रवाशांना फोन केले. त्यातील ६० जणांच्या घरी जाऊन चाचण्या करण्यात आल्या आहेत.