मुंबई- राज्यातील सार्वत्रिक निवडणूक २०१९ दरम्यान अनुचित प्रकार घडू नये यासाठी भारत निवडणूक आयोगाने राज्यात आदर्श आचारसंहिता लागू केली होती. या आचारसंहिता अंमलबजावणी काळात मुंबई उपनगर जिल्ह्यात निवडणूक आचारसंहिता, सामाजिक शांतता भंग करणे व इतर प्रकरणातून भरारी पथकाला १०.३६ कोटी रक्कम व मुद्देमाल जप्त करण्यात यश आले आहे.
मा. भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांनुसार मुंबई उपनगर जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता अमलबजावणी काळात निवडणूक आचारसंहिता भंग, सामाजिक शांतता भंग व इतर प्रकरणांत १४ गुन्हे दाखल करण्यात आले आहे. भरारी पथकांमार्फत कारवाई करण्यात आलेल्या २१ प्रकरणात १०.३६ कोटींची रक्कम व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच मुंबई उपनगर जिल्ह्यातील ५१२९ अनधिकृत फलक हटविण्यात आले आहेत.
आचारसंहिता भंग, सामाजिक शांतता भंग व इतर प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या १४ गुन्ह्यांपैकी ३ अदखल पात्र गुन्हे आहेत. गोरेगाव पोलिसांच्या हद्दीतून ४१० ग्रामचा अवैध गांजा एका उबेर कारमधून जप्त करण्यात आला असून एनडीपीएस नार्कोटिक्स अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कांदिवली पूर्व येथून जिवंत काडतूस आणि बंदूक जप्त करण्यात आली असून आर्म्स अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवैध शस्त्र जप्त
मुंबई उपनगर जिल्ह्यात विविध प्रकरणात अवैधरित्या शस्त्र बाळगणे आणि बेकायदेशीररित्या शस्त्र विकण्याच्या आरोपात भारतीय दंड विधानाच्या शस्त्र कायद्यानुसार आतापर्यंत परवाना नसलेली ३९७ शस्त्र जप्त करण्यात आली आहे. तसेच परवाना धारकांकडून ३९१ शस्त्र जमा करून घेण्यात आली आहेत. यामध्ये तलवारी, चाकू, कोयता, देशी कट्टा, बंदुका, काडतूस, चॉपर सारख्या शस्त्रांचा समावेश आहे.