लातूर - गतवर्षी सोयाबीन आणि इतर बियाणांच्या उगवणीबाबत अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे उत्पादनावर परिणाम झाला होता. याबाबत अनेक शेतकऱ्यांनी तक्रारीही नमूद केल्या होत्या. यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांना योग्य बी- बियाणांचा पुरवठा करण्याचे निर्देश पालकमंत्री अमित देशमुख यांनी खरीप हंगामाच्या बैठकीत दिले आहेत.
उत्पादनाच्या दृष्टीने खरीप हंगाम महत्वाचा आहे. शुक्रवारी हंगामपूर्व आढावा बैठक पार पडली. राज्यमंत्री संजय बनसोडे, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, कृषी सहसंचालक जगताप, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गवसाने उपस्थित होते. तर ऑनलाइन मीटिंगमध्ये माजी मंत्री तथा आमदार संभाजी पाटील निलंगेकर, खासदार सुधाकर शृंगारे, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार सुरेश धस, आमदार अभिमन्यू पवार, आमदार बाबासाहेब पाटील यांनी सहभाग घेतला होता.
खरीप हंगामपूर्व आढावा बैठक अनेक शेतकऱ्याकडून बियाण्यांच्या उगवण क्षमतेबाबत तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. तरी त्या तक्रारीच्या अनुषंगाने यंदाच्या खरीप हंगामामध्ये बियाण्यांच्या क्षमतेबाबत शेतकऱ्यांची तक्रार येणार नाही, यासाठी कृषी विभाग व महाबीजने योग्य त्या उपाययोजना कराव्यात. त्याप्रमाणेच असलेला विविध प्रकारच्या खतांचा पुरवठा वेळेत झाला पाहिजे. शेतकऱ्यांना बी बियाणे व इतर सर्व कृषी निविष्ठांची कमतरता भासणार नाही याचीही दक्षता घेण्याचे निर्देश पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिले.
गतवर्षी लातूर जिल्ह्याला रब्बी हंगामासाठी एकही विमा कंपनी मिळालेली नव्हती. यावर्षी असे होणार नाही, याबाबत कृषी विभागाने काळजी घ्यावी. तसेच पीकविमा मंजूर करताना गाव हे केंद्र मानून शेतकऱ्यांच्या पिकाला विमा संरक्षण मिळाले पाहिजे, असे निर्देशही देशमुख यांनी दिले आहेत. तसेच बी- बियाणांची टंचाई भासणार नाही, यासाठी जिल्हा प्रशासन योग्य ती काळजी घेईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी दिले.