बार्शी - वाढत्या कोरोना रुग्णांचा परिणाम काय होऊ शकतो, हे सध्या बार्शी आणि लगतच्या तालुक्यातील नागरिकांच्या लक्षात येत आहे. आतापर्यंत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून तालुक्यात प्रवेश बंदी केली जात होती. पण आता उपचारासाठीही रुग्णांना प्रवेश देण्यात येऊ नये, या भूमिकेत बार्शीचे लोकप्रतिनिधी आहेत.
इतर तालुक्यातील रुग्णांना उपचारासाठीही प्रवेश बंदी करण्याचा आमदार राऊतांचा इशारा उपचारासाठीही रुग्ण बार्शी तालुक्यात येऊ दिले जाणार नाहीत
बार्शी हे मराठवाड्याचे प्रवेशद्वार आहे. शिवाय शहरात आरोग्य सोयी सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे तालुक्यालगतच्या भूम, उस्मानाबाद, परांडा, माढा, मोहोळ, कळंब, वाशी या तालुक्यातील रुग्ण हे उपाचारासाठी बार्शीत दाखल होतात. उपचार सुरू असलेल्या नागरिकांपैकी 80 टक्के रुग्ण हे उस्मानाबाद जिल्ह्यातील आहेत. या वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेवर ताण येत आहे. निम्म्या पेक्षा जास्त रुग्ण हे उस्मानाबाद जिल्ह्यातील आहेत. त्यामुळे लस, रेमडेसिवीर, ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासंदर्भात खा. ओमराजे निंबाळकर तसेच उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्याशी संपर्क केल्याचे आ.राजेंद्र राऊत यांनी सांगितले आहे. मात्र, याबाबत प्रशासन आणि लोकप्रतिनिधी हे उदासीन आहेत. त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रशासनाचे मदतीचे धोरण नसेल तर, आता उपचारासाठीही रुग्ण बार्शी तालुक्यात येऊ दिले जाणार नाहीत. यासंदर्भात लवकरच सर्व डॉक्टर्स, अधिकारी, सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेऊन याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे. दोन दिवसात सकारात्मक निर्णय न घेतल्यास उपचारासाठीही प्रवेशबंदी असणार आहे. सध्याच्या कोरोना काळात जनतेच्या आरोग्याची जबाबदारी सर्वांवरच आहे. मात्र, मदत मागूनही ऑक्सिजन किंवा रेमडेसिवीर इंजेक्शनच्या पुरवठ्याबाबत उदासीनता असेल तर, दोन दिवसानंतर इतर तालुक्यातील रुग्णांना उपचारासाठीही दाखल करून घेणार नसल्याचे आ. राजेंद्र राऊत यांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा -राज्यात लागणार टाळेबंदी, लवकरच मुख्यमंत्री करणार घोषणा