लातूर- मालमत्ता कर वसूल करुन खडखडाट असलेल्या मनपाची तिजोरी भरण्याचा प्रयत्न प्रशासकीय अधिकाऱ्यांसह महापौर आणि काँग्रेसचे नगरसेवक करीत आहेत. मात्र, काँग्रेसचेच जिल्हाध्यक्ष तथा व्ही मंडळाचे अध्यक्ष व्यंकट बेंद्रे यांनी सध्याची वसुली लातूरकरांवर अन्यायकारक असल्याचे म्हणत पक्षाला घराचा आहेर केला आहे. याचा वसुलीवर आणि पक्षावर काय परिणाम होणार हे पाहावे लागणार आहे.
काँग्रेसमध्ये मालमत्ता कर वसुलीवरुन गटबाजी... हेही वाचा-१५०० आदर्श शाळांसाठी पाच हजार कोटींचा प्रकल्प; तरतूद मात्र शून्य
मालमत्ता वसुलीचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन संबंधित यंत्रणा कामाला लागली आहे. महिन्याकाठी 6 कोटींची वसुली करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे. मात्र, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व्यंकट बेंद्रे यांनी या वसुलीवर सवाल उपस्थित केला आहे. केवळ १२ टक्के सूट देण्याऐवजी २२ टक्के सूट द्यावी, अशी त्यांनी मागणी केली आहे. आतापर्यंत दोन वर्षात १७ आणि २२ टक्के सवलत देऊन वसुली करण्यात आली होती. या प्रकरणी कोर्टात सुनावणीही सुरू आहे. त्यांनतर केवळ १२ टक्के सवलत देऊन वसुली म्हणजे लातूरकरांवर अन्याय आहे. त्यामुळे प्रशासन आणि सत्ताधारी यांनी वसुली नियमानुसारच करण्याची मागणी त्यांनी केली आहे. शिवाय पालकमंत्री अमित देशमुख यांनाही याबाबतीत माहिती दिली असून लातूरकारांच्या हिताचा निर्णय होईल, असा आशावाद पत्रकार परिषदेत त्यांनी व्यक्त केला.
नियमाप्रमाणे वसुली न झाल्यास प्रसंगी आंदोलनाचा पवित्रा घेणार असल्याचे बेंद्रे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे मालमत्ता कर वासुलीवरुन काँग्रेसला घरचाच आहेर मिळाला आहे. त्यामुळे यावर कसा तोडगा काढला जातो हे पाहावे लागणार आहे.