लातूर - लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात काँग्रेसचे अस्तीत्वच धोक्यात आल्याचे चित्र निर्माण झाले आहे. लोकसभेत बसलेल्या झटक्यातून काँग्रेसला अजूनही सावरता आलेले नाही. भाजपला देवेंद्र फडणवीसांसारखे नेतृत्व मिळाले, तर वयाच्या 82 व्या वर्षात शरद पवारांनी राष्ट्रवादीची विसकटलेली घडी बसवायचा प्रण घेतलाय. परिणामी त्यांना त्यात यश सुध्दा मिळताना दिसत आहे. एका मागे एक दिग्गज सोडून गेल्यानंतरही पक्षाची वाताहात त्यांनी होऊ दिली नाही. मात्र, काँग्रेसला अजूनही मार्ग सापडत नसल्याचे चित्र आहे. याच वेळी लातुरात मात्र, वेगळीच काँग्रेस पाहायला मिळत आहे. दिवंगत काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांचे संपुर्ण कुंटुंब राजकारणात सक्रीय झाले आहे. त्यांचे दोन चिरंजीव निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेत तर तीसऱ्याने प्रचाराची धुराळा उडवून दिला आहे. त्यांच्या सभा आणि रॅलीला मिळणारा प्रतिसाद पाहता पडत्या काळात काँग्रेसला 'अच्छे दिन' आणायची ताकद त्यांच्यात असल्याचे राजकीय वर्तुळात बोलल्या जात आहे. त्यामुळे विलासरावांचे चिरंजीव लवकरच राज्यासह राष्ट्रीय राजकारणात सक्रीय झाल्यास नवल वाटायला नको.
छत्रपती उदयनराजे भोसलेंचा शाही दसरा उत्सव
दिवंगत काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांचा संपुर्ण परिवारने बाभळगाव येथील दसरा मेळाव्याला हजेरी लावली होती. यावेळी अमित आणि धिरज देशमुख यांच्या सोबतच अभिनेता रितेश देशमुखही आई आणि पत्नी जेनेलीया सोबत सहभागी झाला होता. बाभळगावात दसरा मेळाव्याची सुरुवात विलासराव यांच्या वडिलांनी केली होती. ही परंपरा त्यांच्या परिवाराने आज ही कायम ठेवली आहे. अमित देशमुख लातूर शहर मतदारसंघाचे आमदार आहेत. ते यावेळीही निवडणूक लढवत आहेत. तर, धिरज देशमुख पहिल्यांदाच विधानसभेच्या रिंगणात उतरले आहेत.