लातूर -अखिल भारतीय नाट्य परिषदेचे शंभरावे वर्ष म्हणून नाट्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा प्रथमच नाट्यसंमेलनाचे स्वरूप बदलण्यात आले असून राज्यातील 13 जिल्ह्यात हे नाट्य संमेलन पार पडणार आहे. त्यामुळे लातूरमध्येही आठ दिवस नाट्यसंमेलनाचा मेळा रंगणार आहे.
27 मार्च जागतिक रंगभूमीच्या दिनाचे औचित्य साधून या नाट्य संमेलनाचे आयोजन केले असल्याचे अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. नाट्य चळवळ ही ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्यासाठी यंदा प्रथमच राज्यातील विविध भागात हे नाट्य संमेलन पार पडणार आहे. याची सुरुवात सांगली येथे होणार असून समारोप मुंबई येथे होणार आहे. दरम्यान, लातूरसह इतर 12 जिल्ह्यात हे नाट्य संमेलन पार पडणार आहे. 4 मे ते 10 मे या कालावधीत लातूरकरांना व्यवसायिक ख्यातनाम नाटकांचा आस्वाद घेता येणार आहे.