कोल्हापूर- शिवाजी विद्यापीठ आणि जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांतील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी गुरुवारपासून (२४ सप्टेंबर) लेखणी, अवजार बंद आंदोलन सुरू केले आहे. ३० सप्टेंबरपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे. सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी आणि आश्वासित प्रगती योजनेची पूर्वलक्षी प्रभावाने अंमलबजावणी, यासह अन्य मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.
अंतिम वर्षाच्या आणि बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांच्या १ ऑक्टोबरपासून परीक्षा होणार आहेत. मात्र, लेखणी बंद आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात शिवाजी विद्यापीठ कृती समिती अंतर्गत शिवाजी विद्यापीठ सेवक संघ, शिवाजी विद्यापीठ ऑफिसर फोरम, महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ या संघटना सहभागी झाल्या आहेत. गुरुवारला सकाळी १०.३० वाजता आंदोलनाला सुरवात झाली होती. पहिल्या दिवशी विद्यापीठातील मुख्य इमारतीमध्ये सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले. दुसऱ्या दिवशी परीक्षा विभागासमोरही ठिय्या आंदोलन झाले. तर, आज तिसऱ्या दिवशी अतुल एतावडेकर, संजय कुबल आणि आनंद खामकर यांच्या नेतृत्वाखाली विविध कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या कार्यालयासमोर मूक निदर्शने केली.
शिष्टमंडळाने कूलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत आंदोलकांच्या मागण्या आणि शासनाची भूमिका याबाबत चर्चा करण्यात आली. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी दिवसभर लेखणी, अवजार बंद आंदोलन केले. ३० सप्टेंबरपर्यंत हे आंदोलन असेच सुरू राहणार आहे. त्यानंतर आंदोलनाची पुढची दिशा ठरवली जाणार आहे.
संघटनांच्या प्रमुख मागण्या-
- सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना पुनर्जीवित करून ती पूर्वलक्षी प्रभावाने लागू करावी.