कोल्हापूर - गावाच्या नव्या स्मशानभूमीत जो कोण मयत झालेल्या व्यक्तीचे प्रथम अंत्यसंस्कार करेल त्याच्या नातेवाईकांना रोख दहा हजार रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. शिवाय नातेवाइकांचे मन परिवर्तन करणाऱ्या व्यक्तीला तीन हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. हे ऐकून तुम्हाला नवल वाटेल. पण हे सत्य आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील नांदगाव हे गाव यासाठी चर्चेत आले आहे. कारण अंधश्रद्धेपोटी गावातील नव्या स्मशानभूमी ऐवजी जुन्या स्मशानभूमीच्या बाजुलाच अंत्यसंस्कार केला जातो. त्यामुळे हैराण झालेल्या ग्रामपंचायत प्रशासनाने नव्या स्मशानभूमीत प्रथम अंत्यसंस्कार करणाऱ्या नातेवाईकांना बक्षीस जाहीर केले आहे. दरम्यान, नेमके हे प्रकरण काय आहे याबाबात ईटीव्ही भारतने आढावा घेतला आहे.
पावसाळ्यात नदीला पूर आल्यानंतर स्मशानभूमी पाण्याखाली जाते
कोल्हापूर जिल्ह्यातील दुर्गम अशा शाहूवाडी तालुक्यातील पन्हाळा यांच्या सरहद्दीवर असणाऱ्या नांदगाव हे गाव जवळपास बावीस हजार लोकवस्तीचे आहे. गावाच्या जवळूनच मणिकर्णिका नदी वाहते. याच नदीच्या काठावर जुनी स्मशानभूमी आहे. गावातील व्यक्ती मयत झाल्यानंतर यापूर्वी नदीकाठी असणाऱ्या स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार केले जायचे. सध्या ही स्मशानभूमी मोडकळीला आली आहे. तर पावसाळ्यात नदीला पूर आल्यानंतर स्मशानभूमी पाण्याखाली जाते. त्यावेळी अंत्यसंस्कार कुठे करायचे? असा प्रश्न समोर आला. त्यावर उपाय म्हणून ग्रामपंचायत प्रशासनाने गावाच्या पश्चिमेला असणार्या माळावर स्मशानभूमी नव्याने उभा केली. याला पाच वर्ष झाले. मात्र, या स्मशानभूमीत आजवर एकही अंत्यसंस्कार झालेले नाहीत.
ग्रामस्थ जुन्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करतात