कोल्हापूर - मुक्या प्राण्यांमध्येसुद्धा एकमेकांप्रती किती प्रेम आणि भावना असतात याची प्रचिती आज कोल्हापूरमधील एका घटनेमुळे आली. एका जखमी वासराला टेम्पोमध्ये घालून उपचारासाठी घेऊन जाताना त्या वासराची माय त्या टेम्पोमागे धावत आली. या घटनेमुळे आई ही शेवटी आईच असते याचा प्रत्यय अनेकांना आला आहे.
मुक्या प्राण्यांमध्येसुद्धा असते माया; व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल गहिवरून
मुक्या प्राण्यांमध्येसुद्धा एकमेकांप्रती माया असते याची प्रचिती आज कोल्हापूरमधील एका घटनेमुळे आली. एका जखमी वासराला टेम्पोमध्ये घालून उपचारासाठी घेऊन जाताना त्या वासराची माय त्या टेम्पोमागे धावत आली. या घटनेमुळे आई ही शेवटी आईच असते याचा प्रत्यय अनेकांना आला.
आज दुपारी कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी परिसरात एका गाईच्या वासराला अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यामुळे ते वासरू जखमी झाले होते. वासरू जखमी अवस्थेतच लक्ष्मीपुरी परिसरात एका रस्त्यावर पडून होते. याची माहिती येथील पंजारपोळ संस्थेला मिळाली. माहिती मिळताच संस्थेचे कर्मचारी याठिकाणी दाखल झाले आणि जखमी गाईच्या वासराला एका टेम्पोमध्ये घालून संस्थेत उपचारासाठी घेऊन जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
या वासराला घेऊन जात असताना या कर्मचाऱ्यांना एक अद्भुत दृश्य पाहायला मिळाले. या जखमी वासराची आई चक्क या टेम्पोमागे धावत येत असल्याचे कर्मचाऱ्यांना निदर्शनास आले. थोड्या अंतरानंतर ही गाय पाठलाग सोडेल असे या कर्मचाऱ्यांना वाटले. पण गाईने टेम्पोचा पाठलाग सोडला नाही. लक्ष्मीपुरी ते पंजारपोळपर्यंत या वासराची माय टेम्पोमागे धावत आली. हा प्रसंग पाहून संस्थेच्या कर्मचाऱ्यांनासुद्धा गहिवरून आले. दरम्यान, जनावरांमध्येसुद्धा एकमेकांप्रती असलेली माया या घटनेतून समोर आली आहे.