कोल्हापूर - गेल्या 18 वर्षांपासून सातत्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परिषद होत आहे. मात्र, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच ऑनलाइन पद्धतीने 19 वी ऊस परिषद घ्यावी लागत आहे. सोमवारी 2 नोव्हेंबरला दुपारी 2 वाजता जयसिंगपूर येथील कल्पवृक्ष गार्डन येथे स्वाभिमानीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये ही परिषद पार पडणार आहे.
दरवर्षी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी परिषदेत काय मागणी करतात? याकडे सर्वांचे लक्ष असते. यावर्षीही परिषदेत नेमकी काय मागणी होते? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 14 टक्के तोडणीचा खर्च कारखानदारांनीच उचलला पाहिजे, अशी भूमिका असणार आहे. ऊस परिषदेपूर्वीच शनिवारी कारखानदार आणि स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बैठक पार पडली. मात्र, यामध्ये कारखानदारांनी केवळ एकरकमी एफआरपी देण्याबाबत मान्य केले आहे आणि स्वाभिमानीच्या इतर मागण्यांना स्पष्टपणे नकार दर्शवला आहे. त्यामुळे त्याच मागण्या उद्याच्या परिषदेत मांडण्यात येणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस दराबाबतची पुढील दिशा सुद्धा जाहीर केली जाणार आहे.
हेही वाचा -एकनाथ खडसेंच्या गाडीला अपघात.. धावत्या कारचा फुटला टायर