कोल्हापूर - शिवरायांच्या अनेक अशा तलवारींपैकी महत्त्वाची असलेली जगदंबा तलवार भारताला परत द्यावी, यासाठी इंग्लंडची राणी व सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आता भारत विरुद्ध इंग्लंडच्या सामन्याला विरोध करण्यात येत आहे. महाराष्ट्राच्या भूमीमध्ये होणाऱ्या खेळास विरोध करण्यात येणार असून यासाठी वेगळ्या मार्गाचा अवलंब केला जाणार आहे. शिवाय वेळ पडल्यास गनिमी काव्याद्वारे आंदोलन करू, असा इशारा शिवदुर्ग संवर्धन आंदोलनचे हर्षल सुर्वे यांनी दिला आहे. त्याचबरोबर जगदंबा तलवारीचा नेमका काय इतिहास आहे, याबाबतसुद्धा इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी माहिती दिली आहे. त्यांच्याशी याबाबत सविस्तर बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी...
जगदंबा तलवारीचा इतिहास
छत्रपती शिवरायांच्या अनेक तलवारींपैकी एक प्रमुख तलवार करवीर छत्रपती घराण्याकडे होती. त्याचे 'जगदंबा तलवार असे नाव होते. आज इंग्लंडच्या राणीच्या व्यक्तिगत संग्रहात असणाऱ्या 'रॉयल कलेक्शन ट्रस्ट'या ठिकाणी सेंट जेम्स पॅलेस येथे ठेवण्यात आली आहे. कोल्हापूर छत्रपतींच्या गादीवर छत्रपती महाराज चौथे हे अकरा वर्षांचे असताना इंग्लंडचा तत्कालीन प्रिन्स ऑफ वेल्स (सातवा एडवर्ड) हा भारत भेटीवर आला होता. सन 1875-76मध्ये त्यांना हीच जगदंबा तलवार भेट म्हणून दिली होती. हीच इंग्लंड येथे असणारी जगदंबा तलवार भारतात परत यावी, अशी शिवभक्तांची भावना आहे. त्यासाठीच आता शिवभक्त आक्रमक झाले आहेत.
राज्याभिषेकासाठी ही तलवार वापरली असल्याचा इतिहास संशोधकांचा अंदाज
खूप कमी लोकांना जगदंबा तलवार पाहायला मिळाली आहे. त्यातील प्रत्यक्ष पाहायला मिळालेल्या काहींनी या तलवारीचे वर्णन आपापल्या ग्रंथांमधून केले आहे. या तलवारीच्या दोन्ही बाजूंना दोन खोल रेघा कोरलेल्या आहेत, त्याला नाळ असे म्हणतात. तलवारीच्या मुठीजवळ जाड पोलादी भागावर सोनेरी फुलांची नक्षी आच्छादित असून लोखंडी सांध्यांजवळील भाग रुंद आणि गोल आहे. तलवारीच्या मुठीच्या टोकाला मोगरा आणि त्यावर सोनेरी फुलांची नक्षी बनविण्यात आली आहे. या सर्व नक्षीवर हिरे, माणिक, मोती आदी सुवर्णजडीत काम करण्यात आले आहे. त्यामुळे ही तलवार लढाईमध्ये वापरली नसून जगदंबा तलवार शिवराज्याभिषेकासाठीच वापरली असल्याचा आपला अभ्यास सांगतो, असे इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी म्हटले.
मोदींनीसुद्धा ही तलवार भारतात आणण्याची घोषणा केली होती
या अगोदर यशवंतराव चव्हाण, बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांच्यापासून ते कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीसुद्धा ही तलवार भारतात परत आणण्याची घोषणा केली होती. तमाम शिवभक्तांच्या भावना या तलवारीशी निगडित आहेत. सन 1875-76मध्ये इंग्लंडच्या प्रिन्सने घेतलेली तलवार भारतात परत आणण्यासाठी आजपर्यंत काहीही प्रयत्न झाले नसल्याची खंतसुद्धा शिवभक्तांकडून व्यक्त केली जात आहे. शिवाय आता शिवभक्त गप्प बसणार नाहीत, कोणत्याही परिस्थितीत 'जगदंबा तलवार' भारताला परत द्यावी, यासाठी इंग्लंड आणि भारतामध्ये होत असलेल्या क्रिकेटच्या सामन्यांमध्ये इंग्लंडच्या टीमला क्रिकेट खेळण्यापासून विरोध करणार असल्याचे 'शिवदुर्ग संवर्धन आंदोलन'च्या माध्यमातून इशारा देण्यात आला आहे.