मुंबई :कोल्हापूर जिल्ह्यात सध्या पुराचे संकट निर्माण झाले आहे. पंचगंगा नदी धोक्याच्या पातळीवर वाहत असून परिसरातील नागरिकांना इशारा देण्यात आला आहे. तसेच राधानगरी धरणही 100 टक्के भरले असल्याने धरणाचे सात स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे पंचगंगा नदी उद्या धोकादायक पातळी गाठणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सतेज पाटील, यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना पत्र लिहून अलमट्टी धरणातून अधिकचा विसर्ग सुरू करण्याची विनंती केली आहे.
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना पत्र :राधानगरी धरणासंदर्भात प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी आज विधानभवनाबाहेर उत्तरे दिली. धरण परिसरात दोन-तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. प्रशासनाने अलर्ट जारी केला आहे. पुन्हा पूर येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. याबाबत मी सभागृहात चर्चा देखील केली आहे,' असे सतेज पाटील यांनी म्हटले आहे.
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर दक्षतेचा इशारा :गेल्या दोन-तीन दिवसांपासून धरण परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. सध्या राधानगरी धरणाचे सात स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. मात्र आणखी दरवाजे उघडल्यास 2021 ची पूरस्थिती पुन्हा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही परिस्थिती टाळता येणार नाही. नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन परिस्थिती मांडणार आहे. अधिकाऱ्यांशीही चर्चा सुरू आहे. नदीकाठच्या भागात राहणाऱ्या लोकांनाही स्थलांतरित केले जात आहे. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दक्षतेचा इशारा दिला आहे. त्यानुसार लोकांना सतर्क केले जात असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.