कोल्हापूर - शेतकर्यांना मुबलक पाणीसाठा उपलब्ध व्हावा आणि मागील वर्षी उद्भवलेल्या पुरस्थितीचा अनुभव पाहता यावर्षी संभाव्य धोका टाळता यावा यासाठी आज भाजप जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी चिकोत्रा आणि नागणवाडी धरणाच्या कामाची पाहणी केली. सेनापती कापशी परिसरासाठी वरदान ठरणाऱ्या चिकोत्रा धरणातील पाणी साठ्याचे भविष्यातील नियोजन व मागील कित्येक वर्षांपासून रखडलेल्या नागणवाडी प्रकल्पाच्या कामाचा आढावा आदी विषयांवर शासकीय अधिकार्यांसोबत त्यांनी चर्चा केली.
समरजितसिंह घाटगेंनी केली चिकोत्रासह नागणवाडी धरणाच्या कामाची पहाणी
सेनापती कापशी परिसरासाठी वरदान ठरणाऱ्या चिकोत्रा धरणातील पाणी साठ्याचे भविष्यातील नियोजन व मागील कित्येक वर्षांपासून रखडलेल्या नागणवाडी प्रकल्पाच्या कामाचा आढावा आदी विषयांवर शासकीय अधिकार्यांसोबत भाजप जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी चर्चा केली.
चिकोत्रा धरण मागील वर्षी १०० टक्के भरले होते. हवामान खात्याच्या अंदाजानुसार या वर्षीही मोठ्या प्रमाणात पाऊस होणार आहे. यामुळे हे धरण लवकरच भरेल असा अंदाज आहे. या धरणातील पाण्याचे योग्य नियोजन झाले तर पुढील अनेक संकटे टाळता येणार आहेत. त्याच अनुषंगाने फडणवीस सरकारच्या काळात मंजूर करून घेतलेल्या माद्याळ, बेलेवाडी मासा, साठवण तलावाची आणि बाळेघोल, तमनाकवडा येथील तलावांच्या सद्य परिस्थितीची देखील यावेळी समरजितसिंह घाटगेंनी आज माहिती घेऊन पहाणी घेतली.
मागच्यावर्षी राजे फाउंडेशनच्या माध्यमातून आरळगुंडी पठारावरील पाणी चिकोत्रा धरणामध्ये वळवल्यामुळे हे धरण शंभर टक्के भरण्यास मदत झाली होती. शेतीसाठी पाण्याची सोय व्हावी आणि नागरिकांना सर्वतोपरी मदत करता यावी यासाठी प्रयत्न करत असल्याचे यावेळी समरजितसिंह घाटगेंनी म्हटले आहे.