कोल्हापूर: जिल्हा परिषद सदस्य राहुल प्रकाश आवाडे यांना अवघ्या महिन्याभरातच दुसऱ्यांदा कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे कोरोना होऊन गेलेल्या व्यक्तीला पुन्हा कोरोनाची लागण होत नाही हा समज फोल ठरला आहे. एकाच व्यक्तीला दोनवेळा कोरोनाची बाधा होण्याची ही जिल्ह्यातील बहुधा पहिलीच घटना आहे. आवाडे यांच्या कुटुंबातील एकूण 18 जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्या सर्वांनी कोरोनावर मात केली होती. मात्र पुन्हा एकदा आवाडे कुटुंबात कोरोनाने शिरकाव केल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.
जिल्हा परिषदेचे सदस्य राहुल आवाडे यांना पुन्हा कोरोनाची लागण; कोल्हापूरातील पहिली घटना समोर
एकदा कोरोना होऊन गेल्यानंतर पुन्हा लागण होत नाही हा समज फोल ठरला आहे. जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांना पुन्हा एकदा कोरोनाची बाधा झाली आहे. एकाच व्यक्तीला दोनवेळा कोरोनाची बाधा होण्याची ही जिल्ह्यातील बहुधा पहिलीच घटना आहे.
मागील सहा महिन्यांपासून देशभरात कोरोनाचे थैमान सुरु असून वस्त्रनगरी इचलकरंजीसुध्दा कोरोनाचे हॉटस्पॉट बनली होती. त्यामध्ये माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार प्रकाश आवाडे यांच्यासह त्यांच्या घरातील सदस्य व कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली होती. या सर्वांनी प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर कोरोनाला हरविले होते. त्यामध्ये जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांचाही समावेश होता. ऑगस्ट महिन्यात त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यावेळी शहरातील अलायन्स हॉस्पिटलमध्ये त्यांनी दहा दिवस उपचारही घेऊन सुखरुपपणे घरी परतले होते. मात्र काल (बुधवार) पासून त्यांना पुन्हा त्रास जाणवू लागला होता. त्यामुळे खबरदारी म्हणून त्यांनी आपली पुन्हा एकदा तपासणी करुन घेतली असता गुरुवारी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. ते सध्या अलायन्स हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाले आहेत.
एकदा कोरोना होऊन गेला की पुन्हा त्या व्यक्तीला कोरोनाची बाधा होत नाही असे मानले जात होते. परंतु राहुल आवाडे यांना अवघ्या सव्वा महिन्यातच दुसऱ्यांदा लागण झाल्याने हा समज फोल ठरला आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही भ्रमात न राहता आपल्यासह कुटुंबिय आणि शहरवासियांच्या आरोग्यासाठी शासकीय नियमांचे पालन करून आपली काळजी घ्यावी, असे आवाहन सुद्धा राहुल आवाडे यांनी केले आहे.