कोल्हापूर - गेली 65 वर्ष झाली तरी मराठी भाषिक कर्नाटकात डांबले गेले आहेत. 1956च्या राज्यपुनर्रचनेमध्ये बेळगाव आणि सीमाभागातील 865 गावे महाराष्ट्रापासून दुरावली. त्यामुळे येथील मराठी भाषिकांवर कन्नडचा अन्यायी वरवंटा फिरू लागला असे म्हणत आज पुन्हा एकदा सीमालढा तेवत ठेवणाच्या सीमावासीयांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आता महाराष्ट्रात यायचंच या भावनेने पुन्हा एकदा सीमा बांधवांनी कोल्हापुरात रणशिंग फुंकले आहे. येथील ऐतिहासिक दसरा चौकात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याच्या साक्षीने एक दिवसाचे धरणे सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. यावेळी सीमा भागातील नागरिक तसेच कोल्हापुरातील राजकीय सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींनी सुद्धा या आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा दिला.
ईटीव्ही भारत प्रतिनिधीने घेतलेला आढावा मुख्यमंत्र्यांकडून खूप अपेक्षा; आपापले पक्ष बाजूला ठेऊन आमच्यावरचा अन्याय दूर करावा -
शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सीमावासियांना बद्दल मोठा लढा उभा केला होता. आता त्यांचे सुपुत्र उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून आमच्या खूप अपेक्षा आहे. 'अभी नही तो कभी नही', 'हीच ती संधी आहे', असं म्हणत सीमाभागातील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी केली. शिवाय, गेल्या अनेक वर्षांपासून हा लढा सुरू आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांनीसुद्धा यामध्ये उदासीनता न दाखवता एकत्र येण्याची गरज आहे. राजकीय पक्षांनी आपल्या पक्षाचे झेंडे बाजूला करत सर्वांनीच मराठी भाषिकांवर होणारा अन्याय दूर करण्यासाठी एकत्र येण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया सुद्धा आंदोलकांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.
हेही वाचा -कोल्हापूरची पोरं 'लै भारी'; दीपावली साहित्य विक्रीच्या नफ्यातून सामाजिक उपक्रम
आजच्या आंदोलनातून सिमवासीयांनी 'या' मागण्या केल्या -
- महाराष्ट्र शासनाने कागल येथे महाराष्ट्र विधानभवन बांधावे आणि दरवर्षी पावसाळी किंवा हिवाळी अधिवेशन येथेच घ्यावे. त्यामुळे सीमा भागातील लोकांना महाराष्ट्र आपल्या पाठीशी आहे असे समाधान वाटेल
- कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज येथे वैद्यकीय महाविद्यालय आणि सुसज्ज हॉस्पिटल उभे करावे. त्यामुळे सीमाभागातील लोकांना वैद्यकीय मदत व दिलासा मिळेल
- चंदगडपासून शिनोळी पर्यंत व पुढे तिलारी पर्यंत फूड पार्क उभे करण्यात यावे. तसेच 7 स्टार एमआयडीसी उभी करण्यात यावी. यामुळे मराठी भाषिक लोकांना रोजगार उपलब्ध होईल
- सांगली येथे टेक्निकल युनिव्हर्सिटी व्हावी. शिवाय आयटी पार्क उभे करावे
- बिदर जिल्ह्यातील उदगीर येथे विद्यापीठ उभे करून त्यास शेकापचे ज्येष्ठ नेते उद्धवराव पाटील यांचे नाव द्यावे
- संपूर्ण सीमाभाग त्वरित केंद्रशासीत करावा.