कोल्हापूर - श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्तमंदिरात या वर्षातील पहिला दक्षिणद्वार सोहळा बुधवारी रात्री 11 वाजून 30 मिनिटांनी संपन्न झाला. मात्र, यंदा कोरोना महामारीमुळे मंदिर परिसर बंद आहे. त्यामुळे या सोहळ्याला कोणालाही जात येत नसल्याने पहिल्यांदाच भक्ताविना दक्षिणद्वार सोहळा झाला. नदीचे पाणी उत्तर बाजूने येऊन श्री स्पर्श करून ते दक्षिणेकडे जाण्याच्या क्रियेला ‘दक्षिणद्वार सोहळा’ असे संबोधले जाते.
दोन दिवसांपासून कोल्हापूरसह जिल्हाभरात मुसळधार पाऊस सुरू आहे. तसेच धरणांतून होणारा विसर्ग यामुळे येथील कृष्णा व पंचगंगा नद्यांच्या पाणीपातळीत चांगलीच वाढ झाली आहे. कृष्णा नदीच्या पाण्याने शिरोळ तालुक्यातील श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथील मंदिरातील दत्त पादुकांना स्पर्श केला. येथील दत्त मंदिरात बुधवारी रात्री साडे आकरा वाजता नदीचे पाणी उत्तर बाजूने येऊन श्रींच्या पादुकांना स्पर्श करून ते दक्षिणेकडे बाहेर पडले, त्यामुळे या वर्षातील हा पहिला ‘दक्षिणद्वार सोहळा’ झाला.