कोल्हापूर -इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश आवाडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना संसर्गाची लक्षणे आढळल्याने तत्काळ तपासणी केली असता त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्यांची तब्बेत ठीक असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना कोल्हापुरातील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
गेल्या 4 दिवसांत जे कोणी संपर्कात आले आहेत, त्यांनी स्वतःहून कोरोना चाचणी करून घ्यावी असे आवाहन आमदार आवाडे यांनी केले आहे. यापूर्वी आवाडे यांचे सुपुत्र आणि नातू यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. शिवाय त्यापाठोपाठ त्यांच्या कुटुंबातील आणि जवळचे, असे एकूण 7 जणांना कोरोनाची लागण झाली होती.
यातील ते सर्व कोरोनामुक्त झाले आहेत. मात्र, आज (शुक्रवार) दुपारी आमदार आवाडे यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाल्याने कार्यकर्ते त्यांच्या बरे होण्याची प्रार्थना करत आहेत.
दरम्यान, जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची दिवसेंदिवस वाढच होत चालली आहे. आजपर्यंत एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 13 हजारांहून अधिक झाली आहे त्यातील एकट्या इचलकरंजी शहरातील रुग्णांची संख्या 1,871 इतकी झाली असून एकूण मृत्यू झालेल्या 353 रुग्णांपैकी इचलकरंजीतील मृतांची संख्या 104 इतकी झाली आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत 5,166 हुन अधिक रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 7319 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
शरद पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे आवाडेंच्या संपर्कात…
दरम्यान, कराड येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक पार पडली होती. यावेळी इचलकरंजी येथील आयजीएम आणि आरोग्य विषयक विविध मुद्द्यांवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार आणि महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या संपर्कात आमदार प्रकाश आवाडे आले होते. चारच दिवसांपूर्वी ही बैठक पार पडली होती. त्यामुळे आवाडे यांनी सुद्धा आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांनी चाचणी करून घेण्याचे आवाहन केले आहे.