कोल्हापूर -आधीच तोट्यात असलेल्या एसटीचे लॉकडाऊनमुळे कंबरडे मोडले गेले. एसटी कर्मचाऱ्यांचा गेल्या तीन महिन्यापासून पगार प्रलंबित आहे. कर्मचाऱ्यांचे हाल सुरू असून, येत्या 7 ऑक्टोबर पर्यंत वेतन द्यावे, अन्यथा येत्या 9 ऑक्टोबरपासून एसटी कर्मचाऱ्यांतर्फे राज्यव्यापी आत्मक्लेश आंदोलन करण्यात येणार आहे, असा इशारा महाराष्ट्र एसटी कामगार (मान्यता प्राप्त) संघटनेचे सरचिटणीस हनुमंत ताटे व राज्याध्यक्ष संदीप शिंदे यांनी दिला आहे.
7 तारखेपर्यंत वेतन द्या, अन्यथा 9 ऑक्टोबरपासून आंदोलन करु; एसटी कर्मचाऱ्यांचा इशारा
येत्या 7 ऑक्टोबर पर्यंत वेतन द्यावे, अन्यथा येत्या 9 आक्टोबरपासून एसटी कर्मचाऱ्यांतर्फे राज्यव्यापी आत्मक्लेश आंदोलन करण्यात येणार आहे, असा इशारा महाराष्ट्र एसटी कामगार मान्यता प्राप्त संघटनेचे सरचिटणिस हनुमंत ताटे व राज्याध्यक्ष संदीप शिंदे यांनी दिला आहे.
कोरोना काळात एसटीची अत्यावश्यक सेवा सुरू होती. या काळात एसटी कर्मचाऱ्यांनी योगदान दिले आहे. तरीही गेले तीन महिने वेतन मिळालेले नाही. त्यामुळे कर्मचारी हवालदिल झाले आहेत. वेतन कायद्यानुसार एसटी महामंडळाने वेळेत वेतन देणे बंधनकारक आहे. राज्य शासनाने वेतनासाठीही तोकडा निधी जाहीर केला. मात्र, अद्याप कर्मचाऱ्यांना वेतन दिलेले नाही, अशी माहिती एसटी संघटनेचे राज्याध्यक्ष संदीप शिंदे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, परिवहन मंत्र्यांशी संघटनेने पत्रव्यवहार केला आहे, मात्र अद्याप वेतन मिळालेले नाही. येत्या 7 ऑक्टोबरपर्यंत प्रलंबित वेतन द्यावे अन्यथा 9 ऑक्टोबरपासून संघटनेचे पदाधिकारी राज्यभरातील विभागात कार्यालयासमोर उपोषण करणार आहेत, असेही ते म्हणाले.