कोल्हापूरKolhapur Railway Issue :कोल्हापूरला कला-क्रीडा-संस्कृती-इतिहास यांचा मोठा वारसा असून, औद्योगिकदृष्ट्यासुध्दा कोल्हापूर महत्त्वाचे शहर आहे. अशा वेळी मिरज-कोल्हापूर रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण आणि विद्युतीकरण झाल्यास कोल्हापूरची कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. यासाठी केंद्र सरकारने कोल्हापूरला विशेष पॅकेज द्यावे अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी सभागृहात केली. (Dhananjay Mahadik in Parliament) नवी दिल्लीत संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून खासदार धनंजय महाडिक यांनी सभागृहात अनेक विषय आणि मुद्दे राज्यसभेत मांडले. मिरज-कोल्हापूर रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण आणि विद्युतीकरण करणे का आवश्यक आहे, याबद्दल सविस्तर माहिती त्यांनी सभागृहाला दिली. (Development of Kolhapur Railway)
औद्योगिक, पर्यटनदृष्ट्या कोल्हापूर प्रमुख केंद्र :कोल्हापूर दक्षिण महाराष्ट्रातील एक प्रमुख शहर असून पर्यटन आणि कृषी, व्यापार, उद्योग क्षेत्रातील आघाडीचा जिल्हा आहे. त्यामुळे दरवर्षी लाखो भाविक, पर्यटक आणि उद्योजक कोल्हापुरात येतात. मात्र, मिरज ते कोल्हापूर रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण आणि विद्युतीकरण रखडले असल्याचे, खासदार महाडिक यांनी सांगितले. वंदे भारत एक्सप्रेससह नव्या रेल्वे गाड्या सुरू करण्यासाठी मिरज-कोल्हापूर रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण आणि विद्युतीकरण लवकर होणे गरजेचे आहे. जिल्ह्यात ऊस आणि गुळाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. शिवाय फाऊंड्री, कापड उद्योग यातूनही मोठी उलाढाल होते. नजीकच्या काळात कोल्हापूर रेल्वे स्थानक कोकण रेल्वेला जोडले जाणार आहे. अशा वेळी मिरज-कोल्हापूर या ४७ किलोमीटरच्या मार्गाचे दुपदरीकरण आणि विद्युतीकरण अत्यंत आवश्यक असल्याचे खासदार महाडिक यांनी राज्यसभेत बोलताना स्पष्ट केले.