कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ गोकुळची निवडणूक 2021 मध्ये झाली होती. या निवडणुकीत महाडिकांच्या सत्ता केंद्राला सुरू लावत आमदार हसन मुश्रीफ, सतीश पाटील खासदार संजय मंडलिक यांनी 21 पैकी 17 जागा जिंकत गोकुळमध्ये सत्तांतर घडवून आणले होते. यानंतर 14 मे 2021 रोजी गोकुळच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील यांची निवड करण्यात आली होती. गोकुळमधील कारभारी मंडळींनी विश्वास पाटील यांना दोन वर्षांचा कालावधी दिला होता. 10 मे रोजी विश्वास पाटील यांच्या अध्यक्षपदाची मुदत संपली आहे. अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांना संधी दिली जाणार आहे, असा शब्द नेत्यांनी डोंगळे यांना दिला होता.
शनिवारी होणार महत्वाची बैठक :सध्या गोकुळची लेखापरीक्षकांमार्फत चौकशी सुरू आहे. यामुळे गोकुळ मध्ये भाजपा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. अध्यक्ष पदाबाबत गोकुळमधील नेत्यांची शनिवारी महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. आमदार हसन मुश्रीफ, सतेज पाटील, खासदार संजय मंडलिक यांच्यासह प्रमुख नेत्यांची या बैठकीला हजेरी असणार आहे.
स्वीकृत सदस्याबाबतही होणार चर्चा :गोकुळचे संचालक विजयसिंह मोरे यांचे काही दिवसांपूर्वीच निधन झाले. दिवंगत मोरे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या संचालक पदाच्या जागेसाठी त्यांच्याच कुटुंबातील सदस्याला संधी देण्याचा सत्ताधारी मंडळींचा विचार आहे. यासाठी दिवंगत मोरे यांचे बंधू आर. के. मोरे यांच्या नावाचा विचार सुरू आहे. शनिवारच्या बैठकीत यावर शिक्का मुहूर्त होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्वीकृत सदस्यपदासाठी गोपाळराव पाटील, भोगावती कारखान्याचे माजी अध्यक्ष सदाशिव चरापले यांचेही प्रयत्न सुरू आहेत.
सत्तासंघर्षाचे गोकुळमध्ये पडसाद :राज्यातील सत्ता संघर्षावर आज सुप्रीम कोर्ट निकाल देणार आहे. या निकालाचे पडसाद गोकुळमध्येही उमटणार आहेत. गोकुळमधील विरोधी बाकावर असलेल्या भाजपने लेखापरीक्षकांमार्फत गोकुळची चौकशी लावली आहे. राज्यातील निकाल भाजपच्या बाजूने लागल्यास त्याचे पडसाद गोकुळमध्ये उमटणार आहेत. मात्र ज्येष्ठ संचालकांनी या निकालाचा गोकुळवर कोणताही परिणाम होणार नाही, ठरल्याप्रमाणे अध्यक्ष बदलला जाईल, असे सांगितले. मात्र अध्यक्ष निवडीवेळी विरोधी भाजप स्वस्त बसणार नाही, असेही चित्र सध्या जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.
- हेही वाचा : 'गोकूळ'च्या निवडणुकीचा मार्ग अखेरीस मोकळा; हस्तक्षेपास न्यायालयाचा नकार
- हेही वाचा : Tamil Nadu Curd Row: तामिळनाडूत 'दही' शब्दावरून वाद.. तामिळ शब्द 'तायिर' वापरण्याचा निर्णय
- हेही वाचा : MLA Satej Patil demand : गोकुळचे लेखापरीक्षण केवळ सध्याचेच का ? गेल्या पंचवीस वर्षापासूनचे करा, सतेज पाटील यांची मागणी