कोल्हापूर - जिल्ह्यात सध्या पावसाचा हाहाकार सुरू आहे. पंचगंगा नदीची पाणीपातळी सध्या एकूण पन्नास फुटांवर आहे. पुढील काही वेळात पंचगंगा नदीची पाणीपातळी हे 50 फुटांवर जाऊ शकते. त्यामुळे खबरदारी म्हणून एनडीआरएफची आणखी एक टीम पाचारण करण्यात आली आहे. तसेच हवाई मार्गासाठी हेलिपॅड तयार करण्याच्या सूचनाही जिल्हा प्रशासनाला दिले आहेत अशी माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हा आपत्ती कक्षाला दहा हेलिपॅड तयार करण्याच्या सुचना -
जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच आहे. त्या पार्श्वभूमीवर अनेक नद्यांचे पाणी वाढत आहे. राष्ट्रीय महामार्गावर पाणी आल्याने कर्नाटकला जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. पाऊस असाच वाढत राहिला तर शिरोली नाका येथे राष्ट्रीय महामार्ग बंद होऊन कोल्हापूरला पाण्याचा वेढा पडू शकतो. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती कक्षाला दहा हेलिपॅड तयार करण्याच्या सूचना दिले आहेत. अशी माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.
धोकादायक ठिकाणी बस घालणाऱ्या चालकावर गुन्हा दाखल -
कोल्हापूरच्या पुरी परिस्थितीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोनवरून चौकशी केली आहे. या सगळ्या परिस्थितीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे लक्ष आहे. तसेच धोकादायक ठिकाणी खाजगी बस घालणाऱ्या चालकावर गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.