कोल्हापूर -झाडे ही पर्यावरणातील महत्वाचा घटक आहेत. त्यामुळे, अनेकजण हौस म्हणून झाडे लावतात, तर काही जणांची झाडांवर प्रचंड निष्ठा असते, म्हणून ते झाडे लावत असतात. कोल्हापुरातल्या आजरा तालुक्यातील एका गावात सुद्धा गेल्या अनेक वर्षांपासून एका वडाच्या झाडावर ग्रामस्थांची प्रचंड श्रद्धा आहे. त्याला कारणही खास आहे, कारण हे झाड जवळपास दीड एकर परिसरात पसरले आहे.
माहिती देताना ग्रामस्थ दिगंबर देसाई हेही वाचा -'गोकुळ'चा दबदबा आता मुंबईत.. सिडकोची पाच एकर जागा मिळणार
दीड एकरात पसरलेले शिरसंगीमधील महाकाय वटवृक्ष
कोल्हापुरातल्या आजरा तालुक्यातील शिरसंगी या गावात गेल्या 300 वर्षांपूर्वीचे जुने वडाचे झाड आहे. या झाडाच्या मुख्य खोडाचा घेरा जवळपास 30 मीटर इतका असल्याचे गावकरी सांगतात. तब्बल दीड एकर पेक्षाही अधिक क्षेत्रात हे झाड पसरलेले आहे. झाडाच्या अनेक पारंब्या जमिनीत रुजून त्यापासूनच हा महाकाय वटवृक्ष आजही तग धरून आहे. इतर सर्वच पारंब्यांना आधार मिळावा, त्या जमिनीमध्ये रुजल्या जाव्या यासाठी प्रत्येक पारंब्यांना सुरक्षित कठडे बांधून घेतले आहेत. त्यामुळे, गावकऱ्यांनीसुद्धा या झाडाचे चांगल्या पद्धतीने जतन केले असल्याचे प्रकर्षाने जाणवते.
झाडाखाली गोठणदेव नावाचे दैवत; ग्रामस्थांची प्रचंड श्रद्धा
या महाकाय झाडाखाली 'गोठणदेव' नावाचे जागृत दैवत आहे, दरवर्षी जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात याची यात्रा होत असते. यंदा सलग दुसऱ्या वर्षी कोरोनामुळे यात्रा मोठ्या प्रमाणात साजरी होणार नाही आहे. या देवावर ग्रामस्थांची प्रचंड श्रद्धा आहे. एव्हढेच नाही तर, आजूबाजूच्या गावातील नागरिकसुद्धा नेहमी देवाच्या दर्शनासाठी येत असतात. आपल्या सर्वच इच्छा आकांक्षा देव पूर्ण करतो, अशी गावकऱ्यांची श्रद्धा आहे. महिलांना याठिकाणी जायला बंदी होती, मात्र काही दिवसांपूर्वी देवाकडे महिलांना त्याठिकाणी प्रवेश मिळावा यासाठी देवाकडे गाराने सुद्धा घालण्यात आले होते.
जोगवा चित्रपटाचेही या परिसरात चित्रीकरण
शिरसंगी गावातील हा महाकाय वटवृक्ष जोगवा चित्रपटामुळे संपूर्ण राज्यभर पोहोचला. इतके मोठे झाड कोल्हापूरमधल्या आजरा तालुक्यात आहे, हे सर्वप्रथम लोकांना समजले. त्यानंतर महाराष्ट्रातील नागरिक उत्सुकतेने या ठिकाणी भेट देऊ लागले. खरेतर या झाडाखाली गोठणदेव नावाचे जागृत देवस्थान आहे. मात्र, या ठिकाणी महिलांना यायला परवानगी नव्हती. जोगवा चित्रपटावेळी महिलांचा वावर या ठिकाणी होणार, अशी कल्पना संबंधितांनी गावकऱ्यांना दिली. त्यानंतर गावकऱ्यांनी देवाकडे गाराने घातले आणि चित्रपटाच्या चित्रिकारणास परवानगी दिली होती, असे ग्रामस्थ दिगंबर देसाई यांनी म्हंटले.
हेही वाचा -राज्य सरकारच्या मराठा आरक्षणाच्या 'या' आदेशाची होळी, नवी मुंबईत २५ जूनला गोलमेज परिषद - सुरेश पाटील